Select Page

प्रागतिक साहित्य पुरस्कार आणि समाजकार्य पुरस्कार

 

महाराष्ट्राला प्रागतिक विचारांची आणि सामाजिक सुधारणांची मोठी परंपरा आहे. महात्मा फुले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, आगरकर, महर्षी कर्वे, महर्षी शिंदे, कर्मवीरभाऊराव पाटील अशा समाजसुधारकांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने आणि लेखणीद्वारे ही परंपरा निर्माण केलेली आहे. ही उज्ज्वल परंपरा साहित्यातून आणि सामाजिक कार्यांतून अशीच पुढे चालू राहावी, तिला उत्तेजन मिळावं आणि तिचे संवर्धन व्हावे या उद्देशाने अमेरिकास्थित सुनील देशमुखांनी पुढाकार घेतला. 1990मध्ये सुनील देशमुखांनी दोन कोटी रुपये महाराष्ट्र फाऊंडेशनला देऊन ही पुरस्कार योजना सुरू केली. पण ते फक्त पैसे देऊन ते थांबले नाहीत तर या पुरस्कारांचे निकष काय असतील, ती योजना पारदर्शकपणे आणि लोकशाही पद्धतीने कशी राबवली जाईल, यांकडेही त्यांनी लक्ष पुरवले. महाराष्टातले सच्चे समाज कार्यकर्ते आणि सामाजिक जाणीव असणारे साहित्यिक पुरस्कार निवडीच्या समितीवर राहतील, याचीही त्यांनी काळजी घेतली. आजही आजच्या समकालीन वास्तवाशी, नवनवीन सामाजिक समस्यांशी आणि आव्हांनाशी  आणि त्यांच्या नवनव्याअभिव्यक्तींशी पुरस्कारांचे सततचे नाते नातेराहिले पाहिजे, हा सुनील देशमुखांचा आग्रह असतो.

जाती-पातींचं निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, स्त्री शिक्षण आणि स्त्री सुधारणा, स्त्री-अत्त्याचार निर्मूलन, स्त्रियांचा सन्मान, लिंगभेद निर्मूलन, हुंडा-विरोध यांसाऱख्यामानवतावादी आणि उदारमवादी चळवळींत प्रत्यक्ष काम करणारे आणि त्या त्या क्षेत्रांमध्ये लेखणी चालवणारे यांना पुरस्कार देण्याची ही योजना आहे.  मृणालताई गोरे हयात असताना मुंबईच्या ‘केशव गोरे स्मारक ट्रस्ट’ ने पहिली पंधरा वर्ष ही योजना राबवण्यासाठी पुढाकार घेतला.  महाराष्टातल्या केशव गोरे स्मारक ट्रस्ट, लोकवाङ्मय गृह आणि साधना ट्रस्ट यांच्या मदतीने यशस्वीपणे राबवली

सुनील देशमुखांनी महाराष्ट्र फाऊंडेशनच्या‘साहित्य-सामाजिक पुरस्कारांची योजना’  सुरू केली. तिला आणि अमेरिकेतल्या आणि महाराष्टातल्याप्रागतिक विचारांच्या अनेक जणांचा हातभार लागलेला आहे. 1994 साली जन्माला आलेल्या या पुरस्कारांचे हे पंचविसावे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. आज मराठी समाजात मानाचे मानले जाणारे हे पुरस्कार रौप्यमहोत्सवी वर्षांत पदार्पण करीत आहेत. भारतातल्या – विशेषतः मुंबईतल्याप्रा. दिगंबर पाध्ये, प्रा. चंद्रकांत केळकर, मृणालताई गोरे आणि लोकवाङ्मय गृहाचे प्रकाश विश्वासराव यांच्या बहुमोल मार्गदर्शनामुळेच ही योजना प्रत्यक्षात अवतरली. सुरुवातीच्या काळातील महाराष्ट्र फाऊंडेशनचे सदस्य राजन गडकरी आणि शिरीष गुप्ते यांनी दीपस्तंभाची भूमिका बजावली. त्यांच्याप्रमाणेच दिलीप चित्रे आणि शोभा चित्रे या पुरस्कार योजनेला एक वेगळीच उंची प्राप्त करून दिली.  प्रा. विद्युत अकलूजकर यांचा सक्रीय सहभाग आणि मार्गदर्शन यांचा विशेष उल्लेख करायला हवा.

पहिली 15 वर्षे मुंबईच्या ‘केशव गोरे स्मारक ट्रस्ट’ ( KGST) या पुरस्कारांची कार्यवाही केली. त्यांच्या अथक प्रयत्नांनीच या योजनेला मूर्त स्वरूप आणि आजची उंची प्राप्त झाली.आम्ही KGSTच्या सर्व स्वंयसेवकांच्या आणि विशेषतः मृणालताईंच्या ऋणात राहणेच पसंत करतो.

गेली नऊ वर्षे पुण्यातील साधना ट्रस्ट या पुरस्कारांचे आयोजन करीत आहे. सुरुवातीला साधनेचे संपादक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नंतर आता साधनेचे विद्यमान संपादक विनोद शिरशाठयांच्य़ा मार्गदर्शनाखाली. साधनेच्या तरुण चमूचा सहभाग आणि दृष्टी यामुळे या पुरस्कारांना एक वेगळेच परिणाम प्राप्त झालेले आहे. नवीन तंत्रज्ञान आणि कार्यक्षमता यांची घातलेली सांगड हे या साधना चमूचे वैशिष्ट्य़ नक्कीच कौतुकास्पद आहे.

जात पंचायतीच्या जाचक निर्बधाविरूद्धची चळवळ, समलैंगिकांच्या हक्कांविषयीची नवी जाणीव, सामाजिक माध्यमांवर प्रसिद्ध होणारे लेखन अशा ‘आजच्या’ -समकालीन वास्तवाशी महाराष्ट्र फाऊंडेशनचेनाते राहिले पाहिजे,यासाठी सुनील देशमुख सदैव जागरुक असतात.

ही पुरस्कार योजना जसजशी आकाराला आली, तसतसे अनेक प्रागतिक मित्र आपापल्या नवनव्या कल्पना आणि दृष्टी घेऊन या पुरस्कार- योजनेकडे आकृष्ट झाले. रजनी इंदुरकर या त्यांपैकी एक. त्यांनी नव्या काळाचा नवा आशय मांडणाऱ्या नव्या नाट्य संहितेसाठी पुरस्कार सुरू केला. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतीनिमित्तही एक नवा पुरस्कार महाराष्ट्र फाऊंडेशनने सुरू केलेला आहे.

पुरस्कार विजेत्यांचे काम लोकांसमोर दिमाखात यावे, हा आमचा प्रयत्न असतो. त्यामुळे तरुणांना प्रेरक ठरतात. त्यांच्याप्रमाणे आपण व्हावे, अशी प्रेरणा त्यांना मिळते. त्यामुळे शानदार समारंभात , महत्त्वाच्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते है पुरस्कार दिले जातात. वर्तमानपत्रे, टीव्हीसाऱखीदृक्-श्राव्य माध्यमे यांद्वारे त्यांच्या कार्याला प्रसिद्धी मिळावी, असा आवर्जून प्रयत्न केला जातो. बऱ्याचदा प्रमुख पाहुणा हा महाराष्ट्राबाहेरचा असतो. भारतीय पातळीवर विचारांची देव-घेव व्हावी, हा त्या मागचा हेतू असतो. आजवरच्या प्रमुख पाहुण्यांत भीष्म साहनी, सुरेश दलाल, अमोल पालेकर, पर्यावरणवादी स्टीव्ह मिल्स, रामचंद्र गुहा अशी काही नामवंत नावं होती..

या निमित्ताने एक संग्राह्य विशेषांक प्रसिद्ध करण्यात येतो. ही कल्पना प्रकाश विश्वासराव यांची. यांत पुरस्कार विजेत्या लेखकांवर आणि सामाजिक कार्यकर्त्यांवर नामवंतांचे लेख असतात. त्यांची छायाचित्रेही असतात.

कालमानानुसार सामाजिक परिस्थिती बदलते आणि त्यानुसार पुरस्कारांचे स्वरुपही बदलत राहते. मात्र साहित्यातील आणि सामाजिक कार्यातील सर्वोच्च पुरस्कार ‘ जीवनगौरव’ राहिलेला आहे.  ललित, वैचारिक, अपारंपरिक ग्रंथांना पुरस्कार देण्याची परंपरा आजतागायत चालूच आहे. समाजकार्यात समाज प्रबोधन, असंघटित कामगारांच्या क्षेत्रांतील कार्य आणि अपारंपरिक या पद्धतीचे पुरस्कार दिले जातात.