Select Page

महाराष्ट्र फाऊंडेशन स्मृति-पुरस्कार २०२०- अरुणा सबाने

अरुणा सबाने गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ विदर्भात ’स्त्रियांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरणारी धाडसी कार्यकर्ती ’म्हणून मुख्यत: काम करत आहेत. स्त्रियांचे प्रश्न, लेखकांचं अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि असहिष्णुता यांसारख्या अनेक मुद्द्यांवर त्यांनी कृतीशील भूमिक घेतलेली आहे. अरुणा सबाने त्या संवेदनशील विषयावर लिहिणाऱ्या लेखिका व ध्येयवादाने भारित झालेल्या संपादक – प्रकाशिका आहेत. स्त्रीवादी जाणिवांना प्रत्यक्ष चळवळीच्या पातळीवर कामाचं परिमाण मिळवून देणाऱ्या कथा-कादंबऱ्या आणि वैचारिक लेखन-संपादन त्यांच्या नावावर आहेत. अलीकडेच त्यांचं ‘माझ्या आईचा बॉयफ्रेंड’ हे आगळंवेगळं पुस्तक प्रसिद्ध झालं आहे. अरुणा सबाने यांचं साहित्य असो, की ‘आकांक्षा’ किंवा ‘माहेर’ सारखी संस्था असो – या सगळ्यात स्वातंत्र्य आणि समता या मूल्यांचं अधिष्ठान आहे. म्हणून त्यांच्या लेखनातील वैचारिक भूमिकेत आणि प्रत्यक्ष कार्यात एकात्मता दिसते.