महाराष्ट्र फाऊंडेशन कार्यकर्ता (संघर्ष) पुरस्कार २०२० – सुधीर अनवले
समाजकार्य हा व्यवसाय बनत चालला असल्याच्या काळात सुधीर अनवले नावाच्या एका तरुणाने नि:स्पृहपणे आज भटक्या-विमुक्तांच्या चळवळीत बांधिलकीच्या भावाने झोकून दिलं आहे. सन २००४ पासून त्यांची ‘भारतीय भटक्या-विमुक्त जमाती विकास संघटना’ लातूर, उस्मानाबाद, नांदेड, बीड, हिंगोली, परभणी, सोलापूर, बुलडाणा, गडचिरोली, औरंगाबाद, जालना, चंद्रपूर, नाशिक, अहमदनगर, वर्धा, अकोला, नागपूर, यवतमाळ या जिल्ह्यांत काम करते आहे. ‘भटक्या-विमुक्तांची चळवळ: स्वरूप व व्यवहार’ हा ग्रंथ आणि ‘भटक्या-विमुक्त चळवळीच्या कविता’ हा त्यांचा काव्यसंग्रह आता प्रकाशनाच्या वाटेवर आहे. शिवाय अनेक वृत्तपत्रे व नियतकालिकांमधून सुधीर यांचे अनेक लेखही प्रकाशित झालेले आहेत. भटक्या-विमुक्तांमधील अंधश्रद्धा संपून त्यांच्यात विज्ञानवादी दृष्टिकोन रुजावा यासाठी चर्चासत्रं, भटक्या-विमुक्तांचं साहित्य संमेलन, भटक्या-विमुक्तांच्या हस्तोद्योग व पारंपरिक व्यवसायातून निर्माण केलेल्या वस्तूंसाठी बाजारपेठ असे सुधीर यांचे अनेक आगामीसंकल्प आहेत.


