Select Page

सुशीला नाईक

कार्यकर्ता : असंघटित कष्टकरी : पुरस्कार २०१६

सामाजिक कार्यकर्त्या
पत्ता –
संपर्क – मो. ९३४३८२६६९१

देवदासीपणाच्या दास्यातून सुशीलाबाई उर्फ सुशाक्का यांनी स्वत:ची सुटका हिमतीने करवून घेतली. आपल्यासारख्या पीडित महिलांना मुक्त करण्यासाठी संघर्ष केला. थेट जीवनसंघर्षातूनच अनुभवसिद्धता प्राप्त करत त्यांनी अत्याचारित महिलांना सन्मानाने जगण्याचे बळ दिले. देवदासी, शेतकरी, दलितांचे प्रश्न, अंधश्रध्दा निर्मूलन अशा चळवळींमध्ये सुशाक्का नेहमीच आघाडीवर असतात. बेळगाव जिल्हयातील निपाणी गावात स्वत:वर लादले गेलेले देवदासीपण त्यांनी निडरपणे नाकारले. विडी कामगार म्हणून काम करताना देवीच्या नावानं गावभर जोगवा मागत हिंडणे सुशीला यांना अपमानास्पद वाटे. देवदासींची कुप्रसिद्ध असलेली खूण म्हणजे केसातील जट. ती गेली पाहिजे असे मनोमन वाटे. पण रुढीपरंपरांविरूद्ध बंड करण्याची त्यांना हिंमत होत नसे. अशातच डॉ. नरेंद्र दाभोलकर व डॉ. बाबा आढाव त्यांना भेटले. ती भेट सुशाक्कांना प्रेरणादायी ठरली. त्यातून लढण्याचे बळ मिळाले. मग पहिल्यांदा स्वत:ची दहा किलो वजनाची लांबलचक बट त्यांनी कापून काढली. त्यानंतर काही दिवसांमध्येच सुशीलाबार्इंनी सहका-यांच्या मदतीने दोन-चार हजार महिलांच्या जटा कापून पिडित महिलांना ख-या अर्थी माणूस बनविले. तळागाळातील आशिक्षित व अंधश्रद्धेच्या जोखडात सापडलेल्या महिलांना बळ देण्याचे मोलाचे काम सुशीला नाईक यांनी उभे केले.

साधनेच्या पुरस्कार विशेषांकातील मुलाखत वाचा…

महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार २०१६- सुशीला नाईक