महाराष्ट्र फाऊंडेशन ललित ग्रंथ पुरस्कार दिलीप वि.चित्रे स्मृति: साहित्य जीवनगौरव सन्मान २०२१- नरेंद्र चपळगावकर, औरंगाबाद
न्या.नरेंद्र चपळगावकर हे महाराष्ट्रातील लोकशिक्षण करणाऱ्या विचारवंतांच्या मालिकेतील एक प्रमुख विचारवंत आहेत.त्यांचे वडील हे बीडमधील एक नावाजलेले वकील होते. न्या.नरेंद्र चपळगावकर यांनी एकाच वेळी कायदा आणि मराठी या दोन विषयांमध्ये पहिल्या वर्गात एम. ए. पूर्ण केले. त्यानंतर ते लातूरला मराठीचे प्राध्यापक म्हणून काम करू लागले. वर्षभरानंतर ते वडिलांना वकिलीत मदत करण्यासाठी बीडला गेले. हळूहळू त्यांच्या वकिलीचा विस्तार वाढला. समाजाचे आपण देणे लागतो याचा त्यांना कधीही विसर पडला नाही. गरीब, दीनदुबळे, मजूर, शाळामास्तर अशा वर्गांचे खटले ते पैसे न घेता चालवत असत. पुढे ते मुंबई हायकोर्टातदेखील वकील म्हणून यशस्वी झाले. उच्च न्यायालयात न्यायमूर्ती झाल्यावरही ते आपले सामाजिक दायित्व विसरले नाहीत.
वकिलीबरोबरच त्यांनी लेखनाच्या क्षेत्रातही भरीव कार्य केले आहे. हैदराबाद स्वातंत्र्यलढ्यावर आधारित ‘कर्मयोगी संन्यासी’ हे त्यांचे पुस्तक स्वामी रामानंद तीर्थांचे अधिकृत चरित्र समजले जाते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात ज्यांनी अतिशय मौलिक कार्य केले त्यांच्या कार्याचा परिचय करून देण्याच्या हेतूने त्यांनी सप्रमाण लेखन करून नेहरू, पटेल, राजाजी, राजेंद्रप्रसाद, सुभाषचंद्र बोस इत्यादींवर त्यांनी ‘त्यांना समजून घेताना’ हे पुस्तक लिहिले. पंडित नेहरू यांच्यावर लिहिलेले त्यांचे पुस्तक येऊ घातले आहे. वैचारिक व अतिशय वाचनीय लेखन, सोपी पण अर्थसमृद्ध शैली ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये आहेत. त्यांचे लेखन कधीही सत्याला सोडून दिसत नाही. अशा या लेखनाचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक मोल फार मोठे आहे.