साहित्य जीवनगौरव पुरस्कार २०२२
रंगनाथ पठारे, संगमनेर
दोन लक्ष रुपये आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे
ऐंशीच्या दशकात उदयाला आलेल्या काथाकार / कादंबरीकार रंगनाथ पठारे यांनी सातत्याने केलेल्या दर्जेदार लेखनाने मराठी साहित्य विश्वात स्वतःची अशी नाममुद्रा आणि ओळख निर्माण केलेली आहे. साठोत्तर कालखंडात लिहू लागलेल्या आणि पुढे प्रभाव निर्माण करणाऱ्या भालचंद्र नेमाडे यांच्या पुढच्या टप्प्यावरचेअत्यंत महत्त्वाचे लेखक म्हणून ते आता ओळखले जातात. आशय, विषय आणि अविष्कार या तिन्ही अंगांनी केलेले सर्जनशील लेखन वेगळ्या स्वरुपाचे आणि मराठी साहित्याला अर्थपूर्ण योगदान करणारे आहे. त्यांच्या लेखनातून अगदी स्वयंभू, वेगळी, सार्वभौम वाटावी अशी आधुनिकता समोर येते. याचे साधे उदाहरण म्हणून लेखकाचा स्त्री-पुरुष संबंधांकडे पाहण्याचा दृष्टिकोन किती वेगळा आहे, हे दाखवणारी त्यांची कादंबरी. दुःखाचे श्वापद, नामुष्कीचे स्वगत, चोषक फलोद्यान, हारण, चक्रव्यूह अशा कादंबऱ्यांमध्ये आपल्या परंपरांनी निर्माण केलेले जगण्याचे सुमार आदर्श लेखकाने ढवळून काढले आहेत. त्यांच्या कथा-कादंबऱ्यातील स्त्री-व्यक्तिरेखा, त्यांची दुःखे पठारे यांचे कथात्म साहित्य वाचनीय आहे, तसेच चिंतनीयही आहे. अपार उत्सुकतेने आणि आस्थेने, खुलेपणाने त्यांनी आपल्या साहित्यातून जीवनाचा शोध घेतलेला आहे.अनुभवाला थेट भिडण्याची ताकद त्यांच्या लेखनात आहे. ‘तात्वीक कलात्मकता’ हे त्यांच्या लेखनाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.
पठारे यांच्या कादंबऱ्या –
दिवे गेलेले दिवस, रथ, चक्रव्यूह, हारण, टाकदार सावलीचे वर्तमान, ताम्रपट, दुखाचे श्वापद, नामुष्कीचे स्वगत, कुंठेचा लोलक, चोषक फलोद्यान आणि अलीकडील त्यांची बृहद् कादंबरी म्हणता येईल अशी सातपाटील कुलवृत्तांत.
कथासंग्रह –
अनुभव विकणे आहे, स्पष्टवक्तेपणाचे प्रयोग, गाभ्यातील प्रकाश, तीव्र व्र कोमल दुःखाचे प्रकरण.
समीक्षा, भाषणे, मुलाखती इ.
सत्त्वाची भाषा, आस्थेचे प्रश्न. प्रत्यय आणि व्यत्यय (मुलाखतसंग्रह – सहलेखक : दिलीप चित्रे),जागतिकीकरण आणि देशीवाद













