ग्रंथ पुरस्कार (वैचारिक / अपारंपरिक)
आत्मकथन – ‘झोळी’ २०२३
डॉ. कालिदास शिंदे
ग्रामीण आणि दलित साहित्याच्याही पुढे जाऊन वंचित आणि उपेक्षित असलेल्या भटक्या आणि विमुक्त जातींचं चित्रण करणाऱ्या साहित्याची निर्मिती होऊ लागली आहे.. ‘झोळी’ या आत्मकथनाच्या रूपानं नाथ पंथीय डवरी/गोसावी या फिरस्त्या समाजाचे भणंग जगणे मराठी साहित्यात प्रथमच अक्षरबद्ध झाले आहे. हा समाज मराठी संस्कृतीचा एक महत्वाचा भाग आहे, बहुजन समाजामधे अध्यात्मीक जागरण करणारा आहे पण त्याचे जगणे मात्र प्रचंड हलाखीचं आणि विवंचनेचं आहे. भगवे कपडे घालून, हाताल त्रिशूळ आणि डमरू घेऊन आणि खांद्यावर झोळी अडकवून हे गोसावी लोक गावोगाव भटकतात आणि भिक्षा मागून गुजराण करतात. त्यांची स्वतःची जमीन असत नाही, घर असत नाही, रहिवासी पुरावा असत नाही, रेशनकार्ड असत नाही. गावा बाहेर पालांतून राहणं आणि वारंवार स्थलांतर करणं, भिक्षा पुरेशी मिळाली नाही तर अर्धपोटी, उपाशी राहणं असं लाचारीचं जीवन त्यांच्या वाट्याला आलेलं असतं. हे आत्मकथन अत्यंत प्रांजळ आहे, वाचनीय आहे, आणि आपल्या एकूण व्यवस्थेवर प्रकाशझोत टाकणारे आहे. कालीदासने आपल्या समाजाच्या बोलीभाषेत हे कथन केले आहे. हा एक प्रांजळ धगधगता समाजानुभव आहे आणि तो अपूर्व आहे.. डॉ.कालिदास शिंदे हे अशा प्रतिकूल परिस्थितीत जन्मून शिकले, डॉक्टरेट मिळली, हे नक्कीच उल्लेखनीय आहे.