Select Page

रा.शं. दातार नाट्यसंहिता पुरस्कार
एकाकिंका – ‘उकळी’ आणि ‘ऱविवार डायरीज’ २०२३
चैतन्य सरदेशपांडे

गेली चार-पाच वर्षे प्रायोगिक रंगभूमीवर चैतन्यने सातत्याने लिखाण केलेले आहे त्याची ही दोन नाटके – रविवार डायरीज आणि उकळी – सद्य परिस्थितीमध्ये महत्त्वाची वाटतात. आशय, विषय, वैविध्य रचना तंत्र प्रयोगशीलता यां निकषांवर हे लिखाण समाधानकारक वाटते. उकळी या नाटकाचा भाषिक संस्कार चांगला आहे गावाकडून शहराकडे जगण्यासाठी आलेल्या माणसांना ज्या अनेक गोष्टींना तोंड द्यावे लागते त्याचा खुसखुशीत परामर्श हे नाटक घेते.
रविवार डायरीज या नाटकाचा विषय जास्त व्यापक आणि खोलवर परिणाम करणारा आहे. जागतिकीकरणाच्या रेट्यानंतर सर्वसामान्य माणसाचे जगणे बदलून गेले आहे. इसवी सन दोन हजारनंतर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये खुले मार्केट तयार झाले. यासाठी माणसांमध्ये क्रयशक्ती निर्माण करण्यात आली या शक्तीला वाट फुटावी यासाठी प्रचंड वैविध्य असलेली बाजारपेठ निर्माण करण्यात आली. या बाजारपेठेमध्ये सुख मिळणार असल्याची जाहिरात केली गेली. बेसुमार चंगळवाद आणि पराकोटीचा व्यक्तिवाद हा माणसाला एकटेपणाकडे घेऊन गेला. मॉल असेल किंवा हातातला मोबाईल असेल माणूस आता तिथे एकटा होऊन सुखाचा शोध घेतो आहे हे चित्रण फार मजेशीर आणि प्रत्ययकारी आहे.