समाजकार्य विशेष पुरस्कार
डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृति पुरस्कार २०२३
शिवकुमार भारती (कानपूर, उत्तर प्रदेश)
(एक लक्ष रुपये आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.)
शिवकुमार भारती चे उत्तर प्रदेशातील कानपूरचे रहिवासी आहेत. सध्या ते अर्जक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. ते अर्जक साप्ताहिकाचे संपादक ही आहेत. अर्जक संघ ही उत्तर भारतातील एक प्रमुख सत्यशोधक चळवळ आहे. पुनर्जन्म, नियतीवाद, जातिभेद, अस्पृश्यता, कर्मकांड, धर्मांधता, कुप्रथा, सरंजामशाही, विषमता, अनादर आणि गरिबी यासह अनेक प्रकारच्या समस्या भारतीय समाजात होत्या आणि आजही आहेत. त्या समुळ नष्ट होण्यासाठी मानवतावादी संस्कृती विकसित करणे, मानवांमध्ये समानता विकसित करणे, उच्च-नीच भेदभाव दूर करणे आणि सर्वांच्या प्रगतीसाठी कार्य करणे हे अर्जक संघाचे उद्दिष्ट आहे.शिवकुमार भारती यांनी आपले कटियार हे आडनाव बदलून भारती असे केले आहे. ते सध्या अर्जक संघाचे वतीने कोणतेही धार्मिक कर्मकांड न करता अर्जक पद्धतीने (सत्यशोधक) विवाह करण्यासाठी मोठी चळवळ चालवतात. असे शेकडो अर्जक विवाह त्यांनी आजपर्यंत लावले आहेत. उत्तर भारतात मृत्यूनंतर मोठ्या प्रमाणात मृत्यू भोज दिला जातो. मृत्यु भोज बंद करून मृत्यूनंतरचे कर्मकांडे नाकारून अर्जक पद्धतीने मृत्यूनंतरचे संस्कार करण्यासाठी लोकांना ते प्रोत्साहित करतात.
शिवकुमार भारती हे अर्जक संघाच्या व्दारे गौतम बुद्ध, रविदास, कबीर, जोतिराव फुले, छत्रपती शाहूजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पेरियार रामास्वामी नायकर, जगदेव प्रसाद, चौधरी महाराज सिंह भारती, ललाईसिंग यादव यांच्या विचारांच्या प्रसाराचे काम करतात. देशभरात अर्जक संघाच्या विस्तार करण्यात भारती यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे.
शिवकुमार भारती हे मानवतावादाचे खंबीर समर्थक आहेत. त्यांचा असा विश्वास आहे की मानवतावाद ही विचारधारा आहे जी मानवांसाठी समानता, आनंद आणि समृद्धीचा मार्ग आहे.