कार्यकर्ता (प्रबोधन) पुरस्कार २०२३
विजय देठे (विरूर)
(पन्नास हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे पुरस्कारचे स्वरूप आहे.)
चंद्रपूर जिल्ह्यातील गोडपिंपरी तालुक्यातले पाचगाव हे गोंड जमातीच्या आदिवासींचे गाव. कधीकाळी रोजगाराची संधी नसल्याने असलेले दारिद्र्य, त्यातच व्यसनाधीनता याने त्रस्त झालेल्या गावाचे चित्र पर्यावरणमित्र संघटनेचे विजय देठे यांनी पत्नी स्मिता आणि सहकार्यांसह बदलले. सर्वात प्रथम जनजागृती करून लोकांना एकत्र आणून गावाभोवती असणार्या जंगलातल्या वनसंपत्तीवरील सामूहिक वन हक्काचा लढा दिला. 3 वर्षांच्या संघर्षांनंतर 2012 साली हा वन हक्क गावाला मिळाला. बांबूची तोड आणि विक्री करण्याचा अधिकार गावाला मिळाला, त्यासोबतच जंगल राखण्याची जबाबदारी देखील गावाने स्वीकारली. यात सरकारी यंत्रणांनी अडचणी आणल्या. मात्र विजय देठे आणि पर्यावरणमित्र संस्थेच्या मार्गदर्शनातून शांतता आणि अहिंसेच्या मार्गाने लढा दिला. त्यानंतर ग्रामसभा नियमित आणि सक्षम करण्यात आली. गावात दारू आणि खर्रा बंदी करण्यात आली. ग्रामसभेने हिशोबाची व्यवस्थाही केली. मुलींच्या शिक्षणाचे प्रमाणही वाढले. याबरोबरच वनोपजातून रोजगारनिर्मिती झाल्याने उत्पन्न वाढून लोकांचे जीवनमान सुधारले.