समाजकार्य कार्यकर्ता (संघर्ष) पुरस्कार २०२४ –
हसीना खान (मुंबई)
(पन्नास हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.)
हसीना खान ‘बेबाक कलेक्टिव्ह’ या आंतर्छेदीय स्त्रीवादी दृष्टिकोनातून मूलतत्त्ववादी आणि दडपशाही शक्तींच्या विरोधात संघर्ष करणार्या संस्थेमध्ये कार्यरत आहेत. गेल्या दोन शतकांहून जास्त काळ त्या स्त्रियांच्या आणि विशेषतः मुस्लिम स्त्रियांच्या हक्कांच्या संवर्धनासाठी काम करत आहेत. जमातवादी हिंसेच्या विरोधातील लढ्यात आणि LGBTQ+ चळवळीच्या समर्थनात त्यांचा सक्रिय सहभाग आहे. लिंगभाव समता आणि सामाजिक न्यायाच्या समर्थनार्थ अनेक अभियानांचे त्यांनी नेतृत्व केले आहे. मुस्लिम स्त्रियांचा आवाज बुलंद करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील परिषदा आयोजित केल्या आहेत. जिथे प्रत्येक व्यक्तीच्या हक्कांचा सन्मान आणि संवर्धन केले जाईल अशा सर्वसमावेशक आणि न्याय्य समाजाच्या निर्माणासाठीची बांधिलकी त्या जपत आहेत.