
डॉ.मनीषा गुप्ते

डॉ. रमेश अवस्थी
अमेरिकेत स्थायिक झालेल्या मराठी माणसांनी स्थापन केलेल्या ‘‘महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेच्या वतीने १९९४ पासून मराठी साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय व अनुकरणीय कामगिरी करणाऱ्य़ा व्यक्तींना व संस्थांना पुरस्कार देऊन गौरविले जाते. १९९६पासून ‘समाजकार्या’च्या क्षेत्रातील तशाच उल्लेखनीय व अनुकरणीय व्यक्तींना पुरस्कार दिले जातात. २०१९ सालापर्यंत या पुरस्कारांचे संयोजन मुंबई येथील ‘केशव गोरे स्मारक ट्रस्ट’च्या वतीने करण्यात येत होते. पहिली १५ वर्षे त्यांना ‘लोकवाङ्मय गृह’ आणि अन्य काही संस्थांची साथ होती. नंतरची १० वर्षे पुणे येथील ‘साधना ट्रस्ट’च्या सहकार्याने हे संयोजन करण्यात आले होते.
गेल्या वर्षीपासून भारतातील संयोजनाची जबाबदारी ‘मासूम’ (महिला सर्वांगीण उत्कर्ष मंडळ – MASUM) या संस्थेकडे आलेली आहे. साहित्य पुरस्कारांचे हे सत्ताविसावे आणि सामाजिक पुरस्कारांचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. पंचवीस वर्षांहून अधिक समृद्ध परंपरा असलेली ही योजना आमच्याकडे कार्यान्वित करण्यासाठी आली, याचा आम्हाला मनापासून आनंद होतो आहे.
दर वर्षी पुरस्कार सोहळा हा ‘महाराष्ट्र फाउंडेशन’च्या प्रतिष्ठेला साजेसा केला जातो. या वर्षी पहिल्यांदा यात खंड पडला आहे कोव्हिड-१९ मुळे. गेल्या वर्षभरात करोनाच्या साथीने जो जगभर धुमाकूळ घातला त्याने काही प्रमाणात आमच्याही कामात व्यत्यय आला, नाही असे नाही, परंतु यां सर्व अडचणींवर मात करून आम्ही दोन्ही क्षेत्रांतले पुरस्कार घोषित केले. मात्र या वर्षी समारंभ करणे शक्य नव्हते हे स्पष्ट झाले. आमचे अमेरिकेतील प्रवर्तक, ‘महाराष्ट्र फाउंडेशन’चे अध्यक्ष, निवड समितीतले सदस्य आणि अन्य सभासद यांना इथे भारतात येणे व्यवहारतः अशक्य होते, तसेच पुरस्कार सन्मानित व्यक्ति आणि त्यांचे चाहते यांनाही या साथीच्या काळात पुण्यात येणे धोक्याचे होते. पुरस्कार समारंभाला महाराष्ट्रातून जी प्रचंड सहभागिता आणि गर्दी असते, त्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होण्याचा धोका होता तो नजरेआड करणे शक्य नव्हते. तेव्हा आम्ही पुरस्कार सोहळा या वर्षी न घेता पुढच्या वर्षी घेण्याचे ठरवले आहे. त्याची रुपरेषा आम्ही यथावकाश जाहीर करूच.
इथे ‘मासूम’ विषयी थोडे सांगायला हवे. मासूम (MASUM) ही संस्था 1987 पासून पश्चिम महाराष्ट्रातील पुणे व अहमदनगर जिल्ह्यामधील दुष्काळी भागात कार्यरत आहे. स्त्रीवादी दृष्टिकोन, संवैधानिक हक्क आणि मानवतावाद ही मूल्ये जोपासण्यासाठी वंचित घटकांमधील स्थानिक नेतृत्व तयार करणे, तसेच राज्य व राष्ट्रीय पातळीवर सामाजिक संस्थांचे प्रशिक्षण घेणे असे अनेक उपक्रम ‘मासूम’तर्फे करण्यात येतात. केशव गोरे स्मारक ट्रस्ट आणि साधना ट्रस्ट सारख्या पुरोगामी संस्थांचा वसा पुढे नेण्याची जबाबदारी ‘महाराष्ट्र फाउंडेशन’ ने ‘मासूम’वर सोपवली आहे याचे भान आम्हाला नक्कीच आहे. या पुरस्कारांना गेल्या पाव शतकात प्राप्त झालेली विश्वासार्हता जपण्याचा आणि ती काही अंशी वाढविण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या ‘मासूम’च्या सहकाऱ्यांसह करणार आहोत. ही जबाबदारी आमच्याकडे सोपवल्याबद्दल महाराष्ट्र फाऊंडेशनचे सध्याचे अध्यक्ष राजीव भालेराव आणि या पुरस्कारांचे प्रवर्तक सुनील देशमुख यांना मनःपूर्वक धन्यवाद.
आतापर्यंत एकूण ३२८ पुरस्कार प्रदान केले गेले आहेत. ( या स्मरणिकेत ही यादी आपल्याला पाहता येईल.) सबंध महाराष्ट्रातले कानाकोपऱ्यातले कार्यकर्ते आणि साहित्यिक या यादीत आहेत. दरवर्षी साहित्य आणि समाजकार्य या दोन्ही क्षेत्रांत मिळून आठ ते अकरा पुरस्कार प्रदान केले जातात. साहित्यामध्ये जीवनगौरव व ग्रंथ पुरस्कार ( ललित, वैचारिक व अपारंपारिक ) सुरूवातीपासून कायम राहिले आहेत, शिवाय वाङ्मय-प्रकार, प्रकाशक, नियतकालिके, अनुवाद, बालसाहित्य यासाठीही वेळोवेळी पुरस्कार दिले गेलेले आहेत. त्याचप्रमाणे समाजकार्याच्या क्षेत्रात जीवनगौरव (व्यक्तीला वा संस्थेला ) आणि कार्यकर्ता पुरस्कार ( प्रबोधन, संघर्ष, रचनात्मक कार्य, सामाजिक प्रश्न, असंघटित कष्टकरी यां प्रकारांत) सुरूवातीपासून प्रदान केले गेले आहेत. खेरीज विशेष कार्य पुरस्कार , कृतज्ञता पुरस्कार, युवा पुरस्कार असेही पुरस्कार वेळोवेळी देण्यात आलेले आहेत. शिवाय मागील सात वर्षांपासून ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार’ प्रदान केला जातो, त्यासाठी गेल्या वर्षीपासून महाराष्ट्राबाहेरील व्यक्ती किंवा संस्था यांचाही विचार केला जातो.
२०२० या वर्षासाठी एकूण अकरा पुरस्कार प्रदान केले जात आहेत. साहित्यामध्ला ‘दिलीप वि. चित्रे जीवनगौरव पुरस्कार’ या वर्षी महेश एलकुंचवार यांना देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे दोन ग्रंथ-पुरस्कार (ललित आणि वैचारिक वा अपारंपरिक ग्रंथासाठी) आणि ‘रा.शं.दातार नाट्य पुरस्कार’ देण्यात येत आहे. आसाराम लोमटे हे ‘साहित्य पुरस्कार निवड समिती’चे अध्यक्ष होते. ’रा.शं.दातार पुरस्कार समिती’चे अध्यक्ष होते ओंकार गोवर्धन. समाजकार्य आणि साहिती पुरस्कार निवड समित्यांमधील मान्यवर सदस्यांची नावे या स्मरणीकेमध्ये नमूद केली आहेत. त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार. पुरस्कार निवडीच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये भारतातील आणि अमेरिकेतील समित्यांसमवेत सुनील देशमुख यांच्याबरोबरीने सक्रिय राहिल्याबद्दल शोभा ताई चित्रे यांचे अगदी मनापासून आभार.
2020 सालचा ‘समाजकार्या’मधला ‘जीवनगौरव पुरस्कार’ गजानन खातू यांना देण्यात येत आहे. महेश एलकुंचवार काय किंवा गजानन खातू काय, अशा व्यक्तींना पुरस्कार देताना अप्रत्यक्षरित्या ‘महाराष्ट्र फाउंडेशन’चाच गौरव होत असतो. डॉ दाभोलकर स्मृती पुरस्कार ‘द्रविड कळघम’चे डों वीरमणी व समाजकार्याचा विशेष कृतज्ञता पुरस्कार जतिन देसाई यांना देण्यात आला आहे. यांखेरीज दोन कार्यकर्ता पुरस्कार (प्रबोधन क्षेत्रातील व संघर्ष क्षेत्रातील) आणि एक युवा पुरस्कार या वर्षी देण्यात येत आहेत.
2020 सालच्या सर्व पुरस्कार सन्मानित व्यक्तींचे सामाजिक कार्य आणि प्रतिभावंत लिखाण आम्हाला नक्कीच समृद्ध करणारे आहे. दर वर्षी पुरस्कारांसाठी योग्य व्यक्ती निवडणे हे आनंदायक आणि आव्हानात्मक काम असते. ही निवड प्रक्रिया तशी वर्षभर चालू राहणारी असते. त्यासाठी भारतात व अमेरिकेत वेगवेगळ्या निवड समित्या असतात. शिवाय महाराष्ट्रातील जाणकारांकडून शिफारशी मागवल्या जातात. या पुरस्कारांसाठी कसलेही अर्ज मागवले जात नाहीत, मात्र कोणी स्वतःहून (पण अर्थातच स्वतःची नव्हे) शिफारशी केल्या तर त्यांचा निवड समिती विचार करू शकते.
या पुरस्कारांची निवडप्रक्रिया गेल्या वर्षीपासून ‘मासूम’कडे आली असली तरीही अनेक व्यक्तींचा हातभार मोलाचा असतो. ही जबाबदारी पार पाडत असताना मुकुंद टाकसाळे यांचे असंख्य पातळ्यांवर मिळालेले सहकार्य आणि सततचे उत्साही योगदान शब्दांत मापणे निव्वळ अशक्य! या स्मरणिकेचे संपादनसुद्धा त्यांनीच केलेले आहे. ‘साधना’ साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ आणि त्यांचे सहकारी, ‘मासूम’चे रवींद्र ठिपसे आणि अन्य सहकारी, तसेच राजू बहाळकर अशा अनेक साथीदारांचे मोठे सहकार्य लाभलेले आहे. स्मरणिकेची देखणी निर्मिती रोहन प्रकाशनाचे प्रदीप चंपानेरकर व त्यांचे सहकारी यांनी केली आहे. या निर्मितीतला दर्जेदार मुखपृष्ठाचा वाटा राजू देशपांडे यांचा आहे. त्याचप्रमाणे मुलाखतींचे व्हिडिओ करण्यासाठी विनायक पाचलग आणि त्यांचे सहकारी यांनी मोलाची मदत केलेली आहे. सर्वांना मनःपुर्वक धन्यवाद.
आपणां सर्वांची आम्हाला साथ आहे, त्याच बळावर आम्ही या जबाबदारीला सामोरे जात आहोत.
महिला सर्वांगीण उत्कर्ष मंडळ (MASUM – मासूम) डॉ. मनीषा गुप्ते ४२- बी१, कुबेरा विहार, गाडीतळ, हडपसर, पुणे ४११०२८ डॉ. रमेश अवस्थी दूरध्वनी: ०२० -२६९९५६२५ / २६९९५६३३ संस्थापक आणि सहसमन्वयक,‘मासूम’