Select Page

महाराष्ट्र फाऊंडेशन  समाजकार्य जीवनगौरव सन्मान २०२१-प्रेमाताई पुरव (अन्नपूर्णा परिवार, पुणे/मुंबई)

प्रेमाताई पुरव यांचा जन्म १५ ऑगस्ट १९३५ रोजी गोव्यात झाला. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली. त्यानंतर गोवा मुक्ती आंदोलनातदेखील त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. गोवा पोर्तुगीजांच्या जोखडातून मुक्त झाल्यावर त्यांनी आपले सर्व आयुष्य महिलांना उद्योजिका बनवून त्यांना आर्थिकदृष्ट्या सबळ करण्याच्या कार्यात झोकून दिले. प्रेमाताई म्हणजे सामाजिक कार्य, महिलांचे शिक्षण आणि पर्यावरण रक्षणासाठी कटिबद्ध असणाऱ्या कार्यकर्त्या आहेत.
महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हाव्यात म्हणून त्यांनी काही महिलांना बरोबर घेऊन १९७५ साली ‘अन्नपूर्णा महिला मंडळा’ ची स्थापना केली व भाजीपोळीचे डबे पुरवायला सुरुवात केली. १९८२ साली गिरणी कामगारांच्या अभूतपूर्व संपानंतर मुंबईतील गिरण्या बंद पडल्या. तेव्हा त्यांनी कामगारांच्या घरातील स्त्रियांना खाणावळ चालवण्याचे धडे दिले. गेली दोन दशके प्रेमाताईंच्या ज्येष्ठ कन्या डॉ. मेधा सामंत-पुरव या ‘अन्नपूर्णा परिवारा’तील सहा सहयोगी संस्थांची धुरा सांभाळत आहेत. प्रेमाताईंच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन भारत सरकारने २००२ साली त्यांना ‘पद्मश्री’ सन्मान देऊन गौरवले तर ‘अखिल भारतीय महिला शिक्षण निधी संस्थे’ने २००२ साली ‘स्त्री रत्न’ पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला.