Select Page

दिलीप वि. चित्रे स्मृती साहित्य जीवनगौरव पुरस्कार २०२४ –
प्रा. आ.ह.साळुंखे, सातारा
(दोन लक्ष रुपये आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.)

आधुनिक काळातील एक महत्त्वाचे साक्षेपी विचारवंत, संशोधक, प्रबोधक आणि व्यासंगी लेखक म्हणून डॉ. आ. ह. साळुंखे (१९४३) हे महाराष्ट्राला परिचित आहेत. डॉ. साळुंखे आजवर अखंड अविरत एकांड्या निष्ठेने हे ज्ञाननिष्ठेचे काम करत आले आहेत. डॉ. आ. ह. सांळुखे यांच्या आजवरच्या अभ्यास, संशोधन आणि समाजकार्यास अनेकविध स्वरूपाचे पैलू आहेत. प्राच्यविद्या पंडित, तौलनिक धर्मशास्त्राचे गाढे अभ्यासक, संस्कृत-पाली भाषेचे मर्मज्ञ संशोधक, इतिहासाचे भाष्यकार, संस्कृती अभ्यासक म्हणून त्यांनी प्रबोधनपर साहित्यात मोलाची भर टाकलेली आहे. आजवर त्यांची विविध विषयांवरील ५९ पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यांचे एकंदर लेखन व कार्यस्वभाव हा मानवतावादी, विवेकवादी, इहवादी, समतावादी, विज्ञानवादी दृष्टीचा आहे. . ‘हिंदू संस्कृती आणि स्त्री’, व ‘महाभारतातील स्त्रिया’ या चार खंडात्मक ग्रंथात त्यांनी भारतीय स्त्रियांच्या स्थितीचा महत्त्वाचा लेखन प्रकल्प सादर केला आहे. प्राचीन भारतातील स्त्रियांवर केलेले त्यांचे हे लेखन मूलभूत आणि नवे समाजशास्त्रीय स्वरूपाचे आहे. रेणुका, दमयंती, माधवी, शर्मिष्ठा, द्रोपदी, सावित्री, अंबा, गांधारी, शकुंतला या महाभारतातील स्त्रीचरित्रांचा त्यांनी घेतलेला शोध हा नवीन आहे. स्त्री स्वातंत्र्याचे खरेखुरे पुरस्कर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. डॉ. साळुंखे यांच्यासारखा ज्ञानवंत, विचारवंत माणूस आजच्या काळात विरळा. त्यांनी विश्वकोशात विविध महत्त्वाच्या विषयावर शंभरहून अधिक नोंदी लिहिल्या आहेत. ‘हिंदू संस्कृती आणि स्त्री’ धर्म की धर्मापलीकडे?’ ‘महाभारतातील स्त्रिया’, ‘आस्तिकशिरोमणी चार्वाक’, ‘मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती’, ‘आता आमच्या धडावर आमचेच डोके असेल’, ‘विद्रोही तकुाराम’ ‘बळीवंश’ ‘तथागत बुद्ध आणि संत तुकाराम’ इत्यादी त्यांचे महत्त्वाचे ग्रंथ आहेत.