
अरुण जाधव
कार्यकर्ता : सामाजिक प्रश्नांच्या संघर्षासाठी !
सामाजिक कार्यकर्ते
पत्ता –
संपर्क – मो. ९४२२२२६०६६
अॅड. अरुण हिराबाई जाधव हे शाहू-फुले-आंबेडकरी विचारांचे भटके-विमुक्त समाजाचे प्रतिनिधित्व करणारे कृतिशील कार्यकर्ते आहेत. सामाजिक प्रश्नांच्या संघर्षासाठी ते करत सतत धडपडत असतात. गावात घर नाही, शहरवस्तीतल्या झोपडपट्टीतही सन्मान नाही, रेशनकार्ड नाही, बँकेत खाते नाही, मतदारयादीत नाव नाही; अशा माणसांना आधार देत अरुण जाधवांनी आपली सर्वसामान्यांशी नाळ जोडली. कुठेही जातीय अन्याय-अत्याचार झाल्याचे कळल्यावर अहमदनगर येथील ‘लोक अधिकार आंदोलन’ संघटनेमार्फत अरुण व त्यांचे सहकारी कार्यकर्ते धावून जातात. जन्मजात गुन्हेगार ठरविलेल्या कोल्हाटी समाजातून ते वर आले. ते आपले नाव ‘अरुण हिराबाई जाधव’ असे अभिमानाने मिरवतात. ‘पारधी विकास आराखडा मोहिम’, ‘कौटुंबिक हिंसाविरोधी अभियान’ यामार्फत वंचितांच्या न्याय्य हक्कांसाठी ते अहोरात्र कार्यरत असतात. ‘लोक अधिकार आंदोलन’, ‘समता आंदोलन’, ‘भारीप बहुजन महासंघ’ अशा व्यासपीठांवरुन त्यांनी सामाजिक अभिसरणाचं महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. वंचितांहून वंचित घटकांच्या प्रश्नांना अग्रक्रमाने सोडविण्यात ते कायम प्रयत्नशील असतात. कला केंद्रातील नाचणा-या नायकिणींच्या अनाथ बालकांसाठी उभारलेला त्यांचा निवारा प्रकल्प सामाजिक बांधिलकीचा अनोखा अविष्कार आहे. कोल्हाटी समाज, मुस्लिम, बौध्द, मातंग, भटके-विमुक्त अशा समाजातील नायकिणी, पीडित महिला यांना आत्मनिर्भर बनवणे हे त्यांचे ध्येय आहे. त्याचप्रमाणे या महिलांच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी विविध योजना आणि उपक्रम अरुण जाधव सतत राबवत असतात.