Select Page

पुरस्काराचे नाव – दिलीप वि. चित्रे स्मृती साहित्य जीवनगौरव पुरस्कार
पुरस्काराचे स्वरूप – दोन लक्ष रुपये आणि सन्मानचिन्ह
पुरस्कार सन्मानित व्यक्तीचे नाव – अरुण खोपकर

‘जागतिक दृष्टी’ असलेला लेखक-कलावंत
जागतिक कीर्तीचे चित्रपट-दिग्दर्शक असणाऱ्या अरुण खोपकर यांनी चित्रपट, चित्रपट क्षेत्रातील व्यक्ती, त्यांची कामगिरी यांवर पाच पुस्तके लिहिली आहेत. ‘गुरुदत्त : तीन अंकी शोकांतिका’ हे खोपकरांचे पहिले पुस्तक. त्यानंतर आलेल्या त्यांच्या ‘चित्रव्यूह’ (नोव्हेंबर २०१२) आणि ‘चलत्-चित्रव्यूह’ (नोव्हेंबर २०१२) या जुळ्या पुस्तकांतल्या एकंदर तीस लेखांपैकी पंचवीस लेख व्यक्तींविषयी आहेत. या व्यक्तींना आपल्या आयुष्याला कसा आकार दिला, आपले आयुष्य कसे समृद्ध केले, हे सांगत असतानाच तत्कालीन काळाचाही मोठा पट उलगडून दाखवतात. त्यामुळे या पुस्तकांतून गेल्या चार-पाच दशकांतल्या अनेक कलाप्रवाहांच्या बदलत्या रूपांचाही मागोवा 

पाहायला मिळतो. कवी नारायण सुर्वे, लोकनाट्य-कलाकार दादू इंदुरीकर, मामा वरेरकर, श्री.ना. पेंडसे यांच्यासारखे लेखक; खाँसाहेब अहमदजान तिरखवाँ, पं.शरच्चंद्र आरोलकर, भास्कर चंदावरकर, अमीर खाँसाहेब असे संगीतक्षेत्रातले कलावंत; चित्रपटतज्ज्ञ सतीश बहादूर, लच्छू महाराज, कृष्ण नायर हे नृत्य कलावंत; सुलेखनतज्ज्ञ र. कृ. जोशी, स्थापत्यविशारद चार्ल्स कोरिया; जहांगीर सबावाला, भूपेन खक्कर, सुधीर पटवर्धन असे भिन्न प्रकृतीचे चित्रकार; मणी कौल, ऋत्विक घटक असे चित्रपट दिग्दर्शक; के. के. महाजन यांच्यासारखे चित्रपट छायालेखक; या नामावलीवरूनच खोपकरांच्या पैस आणि परीघ समजतो. त्यानंतरची खोपकरांची ‘अनुनाद’ (२०२०), ‘कालकल्लोळ’ (२१ जुलै २०२१) आणि ‘प्राक्-सिनेमा’ (जुलै २०२२) ही पुस्तक-त्रयी अलीकडच्या काळात प्रकाशित झाली आहे. त्याचबरोबर शब्द, श्रुत आणि दृश्य या तिन्ही माध्यमांतील कलाविषयीचं चिंतन; शास्त्रीय व अभिजात संगीताची समज, नृत्यापासून वास्तववादी व आधुनिक चित्रकला व चित्रपट यांची जाणकारी आणि लोककला तमाशा यांचाही अभ्यास. असे सर्वत्र संचार असणारे भान दाखवणारी कलासमीक्षा मराठीत फारच क्वचित प्रमाणात दिसते. ही समीक्षा असली तरी ती ललित अंगाने लिहिलेली आहे. भास्कर चंदावरकर यांचे लेख संकलित आणि संपादित करून त्यांनी चित्रभास्कर आणि रंगभास्कर हे दोन अपूर्व ग्रंथ मराठी साहित्य सृष्टीला बहाल केलेले आहेत. त्यांच्या ग्रंथांना महाराष्ट्र फाउंडेशन, साहित्य अकादमी असा अनेक मान्यवर संस्थांचे पुरस्कार लाभले आहेत.
यांखेरीज त्यांनी स्वतः निर्मिलेल्या चित्रपटांची, लघुपटांची कारकीर्द, त्यांना मिळालेले राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार हा त्यांचा स्वतंत्र कर्तृत्वविशेष आहे.