
अरुण साधू
साहित्य जीवनगौरव पुरस्कार २०१६
पत्रकार, कादंबरीकार
मराठी आणि इंग्लिश या दोन्हीं भाषांमध्ये नावाजलेले अभ्यासू लेखक, पत्रकार असा अरुण साधू यांचा परिचय आहे. ‘मुंबई दिनांक’ व ‘सिंहासन’ या दोन कादंब-यांमुळे राजकीय विषयांवरील कादंबरीकार असा लौकीक त्यांनी प्राप्त केला. महानगरीच विश्व कादंब-यांच्या माध्यमातून मांडत अरुण साधू यांनी मराठीत राजकीय कादंब-यांचे दालन खुले केले. वास्तववादी आणि वैश्विक भान असलेले त्यांचे लिखण वैशिष्टयपूर्ण असेच आहे. दीर्घकाळच्या पत्रकारितेतील अनुभवही त्यांच्या साहित्यलेखनातून प्रभावीपणे प्रकटले. ‘झिपऱ्या’, ‘स्फोट’ सारख्या कादंब-या, ‘पडघम’ हे नाटक, ‘अक्षांश-रेखांश’, ‘तिसरी क्रांती’ ही त्यांनी लिहिलेली काही वैश्ष्टियपूर्ण पुस्तके. ‘सांगत्ये ऐका’ हे हंसा वाडकर यांचे आत्मकथन साधू यांनीच वाचकांसमोर आणले. मराठी भाषेच्या संदर्भात व महाराष्ट्र राज्याच्या संदर्भात साधूंनी कायमच ठोस भूमिका घेतली. प्रसंगी आपल्या लेखणीतून प्रभावीपणे मांडली. समकालीन देशी-विदेशी इतिहासावरील त्यांचे लेखन अभ्यासपूर्ण होते. बंडखोरपणाच्या आकर्षणातून ‘फिडेल चे आणि क्रांती,’ ‘ड्रॅगन जागा झाल्यावर,’, ‘तिसरी क्रांती’ सारखे विषय हाताळले. ते मान्यवर कथा-कादंबरीकार तर आहेतच, पण कथा-पटकथा, नाटक -एकांकिका, अनुवाद, समकालीन इतिहास, चरित्र असे विविधांगी लेखन-प्रकारही त्यांनी तेवढ्याच ताकदीने हाताळले आहेत.
साधनेच्या पुरस्कार विशेषांकातील मुलाखत वाचा…



