बाळकृष्ण रेणके
कार्यकर्ता पुरस्कार 2013 : सामाजिक प्रश्न
सामाजिक कार्यकर्ते
पत्ता एफ १/ए ५, अवंतीनगर, सोलापूर ४१३ ००२
सपर्क – मो. ९४२२४५७४७१
बाळकृष्ण रेणके हे सामाजिक भान असलेले निष्ठावान कार्यकर्ते आहेत. भटक्या विमुक्तांसाठीच्या चळवळीला राष्ट्रीय चेहरा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य बाळकृष्ण रेणके यांनी केले. देशातील अठरा राज्यात पसरलेल्या ‘लोकधारा विमुक्त भटके राष्ट्रीय समन्वय संघटनेचे’ ते अध्यक्ष आहेत. गेली साडेपाच दशकांहून अधिक काळ ते भटक्या विमुक्तांसाठीच लढत आहेत. लहानवयात भिक्षुकीसाठी वडील, काका यांच्याबरोबर गावोगावी फिरताना शिक्षणाची आवड असूनही शिकता येत नव्हते. अपमान, अवहेलना,कमालीची तुच्छता लहानपणापासूनच वाट्याला आलेली. तशात पोटातलीकायमस्वरुपीभूक तर रेणक्यांच्या पाचवीलाच पुजलेली. शेवटी त्यांनी मुंबई गाठली. फुटपाथवर राहून, पडेल ते काम करूनते स्वत:ला घडवत राहिले, शिक्षण घेत राहिले आणि त्यांनी भटक्या विमुक्तांची देशातील पहिली संघटना उभारली. अहोरात्र भटक्या विमुक्तांच्या लढयाला सर्वस्व वाहिले. यातून केंद्र सरकारने २००६ साली नेमलेल्या पहिल्या राष्ट्रीय आयोगाच्या अध्यक्षपदाचा मान रेणके यांना दिला. इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. त्या आयोगाच्या ६०० पानी अहवालात भटक्या विमुक्तांची कैफियत तर रेणके यांनी मांडलीच पण त्यांना मुख्य प्रवाहात सामील करुन घेण्यासाठी गेली ५५-६० वर्षे ते मनापासून लढत आहेत, झटत आहेत.