Select Page

डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृति पुरस्कार सन्मान २०२४ –
देबेंद्र सुतार (कटक, ओरिसा)
(एक लक्ष रुपये आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.)

देबेंद्र सुतार (वय ५० ) हे ओरिसा रॅशनॅलिस्ट सोसायटी (ज.ठ.ड.) या संघटनेचे राज्य सेक्रेटरी आहेत. ते गेली २५ वर्षे पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम करतात.
“ओरिसा रॅशनॅलिस्ट सोसायटी ही ओरिसातील आणखी एक विवेकवादी संघटना आहे. ती गेली २५ वर्षे कार्यरत आहे. या संघटनेच्या वतीने ‘वैज्ञानिक चर्चा’ या नावाने एक त्रैमासिक निघते.” त्याचे संपादक देबेंद्र सुतार हेच आहेत. त्याच्या दोन हजार प्रती काढल्या जातात. राज्यातील त्यांच्या तीस केंद्रांना त्या पाठवल्या जातात. ५० रुपयांप्रमाणे त्याची विक्री केली जाते. त्यांच्या संघटनेच्या वतीने आतापर्यंत ४५ विषयांची पुस्तके प्रकाशित केली आहेत. १० रुपये किमतीच्या पुस्तकांना मोठी मागणी असते. ‘शिवाजी कोण होता?’ हे कॉ. गोविंद पानसरे यांचे पुस्तकही त्यांनी ओडिया भाषेत प्रकाशित केले आहे.
डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे चरित्र ओडिया भाषेत प्रकाशित करायची त्यांची तीव्र इच्छा आहे. अनेक विवेकवादी कार्यकर्ते हे लेखन, प्रबोधन या अंगाने काम करतात . पण कटक येथील देबेंद्र सुतार हे रस्त्यावर उतरून संघर्ष करणारे कार्यकर्ते आहेत.
ओरिसामध्ये प्रचलित असलेल्या चेटकीण प्रथेविरोधात देबेंद्र सुतार यांचा संघर्ष नेहमी सुरू असतो. राज्यात कोठेही चेटकीण बळीची घटना घडली की, ते लगेच तेथे भेट देतात. पोलीस आणि प्रशासन यांच्या मागे लागून गुन्हा नोंद करतात. आतापर्यंत त्यांनी राज्यातील दहा वर्षांचा चेटकीण प्रथेचा संपूर्ण डाटा संग्रही करून त्यावर साडेतीनशे पानी पुस्तक लिहिले आहे.
राज्यात कोठेही चमत्कारांचे प्रकार घडले की, देबेंद्र सुतार तेथे प्रत्यक्ष जाऊन त्याचा भांडाफोड करतात. अंधश्रद्धा, धर्मांधता या विषयावरील टी. व्ही. डिबेटमध्ये त्यांना बोलावले जाते. त्यांनी अनेक सामाजिक विषयांवर हायकोर्टामध्ये जनहित याचिका दाखल केल्या आहेत. चेटकीण प्रथेविरोधातील त्यांच्या एका याचिकेमुळेच सरकारला चेटकीण प्रतिबंधक कायदा करणे भाग पडले. राज्यातील बर्‍याच सरकारी जमिनीवर काही मंदिरांनी, बुवा-बाबांनी अतिक्रमण केले आहे. मोठ्या प्रमाणात सरकारी जमिनी लुटल्या आहेत. या सर्वांची सविस्तर माहिती काढून सुतार यांनी कटक हायकोर्टात एक याचिका दाखल केली. सरकारी जमिनीवरील हे धार्मिक अतिक्रमण काढून टाकावे, अशी मागणी त्या याचिकेत केली. या याचिकेमुळे त्यांना प्रचंड रोषाला सामोरे जावे लागले. एका मोठ्या बुवाने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तेव्हा काही काळ ओरिसा पोलिसांनी त्यांना पोलीस संरक्षण दिले होते.