
देवाजी तोफा
कार्यकर्ता :प्रबोधन पुरस्कार २०१६
सामाजिक कार्यकर्ते
पत्ता –
संपर्क – मो. ९४२१७३४०१८
आदिवासी प्रदेश, आदिवासी जीवन व संस्कृती संदर्भात जनजागृती करण्यात देवाजी तोफा यांनी आपलं आयुष्य समर्पित केलं. गडचिरोली जिल्हयातील धानोरा तालुक्यात जंगलाच्या कुशीत वसलेले मेंढा-लेखा हे त्यांचे गाव. येथे ‘आमच्या गावात आम्हीच सरकार’ हा अभिनव प्रयोग त्यांनी राबवला. समाजधर्मी मोहन हिराबाई हिरालाल यांच्या बरोबरीने ते सामाजिक कार्यात अग्रभागी राहिले. आदिवासींचे दैनंदिन आयुष्य जगतानाच समाजवादी पुढारी लालश्याम महाराज यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव पडला. संत तुकडोजी महाराजांच्या विचारांनी प्रभावित होऊन त्यांनी समाजकार्यात झोकून देण्याचे ठरवले. जनसामान्यातील वाढती लोकप्रियता व स्थानिक स्रेहींच्या प्रेमळ दबावामुळे त्यांनी लेखा ग्रामपंचायतीचे सदस्यत्व स्विकारले. दरम्यान ‘जंगल बचाव मानव बचाव’ मोहिमेत सहभागी झाले. समता व अहिंसा यावर आधारित समाजनिर्मितीची ओढ असल्याने अल्पावधीतच त्यांनी राजकारणाला रामाराम ठोकला. स्वत:ला निसर्ग साधनसंपत्तीचा विनियोग या संदर्भातील कार्यात गुंतविले. झगडे-तंटे मिटविणे, निसर्गाचा -हास थांबवणे, , हिंसात्मक चळवळींना प्रोत्साहन देणा-यांविरूद्ध अहिंसात्मक पध्दतीने आवाज उठवणे, बंदूकधा-यांशी न घाबरता चर्चा करणे असे निर्भिड प्रबोधनकार्य ते तीन दशकांहून अधिक काळ करत आहेत.