महाराष्ट्र फाऊंडेशन ललित ग्रंथ पुरस्कार साहित्यकृती : ‘दगडी मक्ता’ (कादंबरी) सन्मान २०२१- डॉ. रमेश अंधारे अमरावती
रमेश अंधारे हे स्वतः ग्रामीण भागातून आलेले असून त्यांच्या मनात उपेक्षित आणि कष्टकरी जनतेच्या जीवनाविषयी एक नैसर्गिक सहानुभूती दिसून येते. ‘पागोरा’ आणि ‘दगडी मक्ता’ अशा दोनच कादंबऱ्या लिहून त्यांनी कादंबरी वाङ्मयाच्या क्षेत्रात आपले स्थान निश्चित केले. ग्रंथाली प्रकाशनाने १९९९ साली प्रकाशित केलेल्या ‘पागोरा’ या आत्मकथनपर कादंबरीत बहुजन समाजातून पुढे येऊ पाहणाऱ्या तरुणांचे चित्रण त्यांनी केले. ‘दगडी मक्ता’ या कादंबरीत त्यांनी संघर्षशील पाथरवटांचे हृदयस्पर्शी चित्रण रेखाटले आहे. तसेच त्यांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांचे चरित्र लिहिले असून ‘मुद्रा महाराष्ट्राची’ हा ग्रंथदेखील संपादित केला आहे.