Select Page

साहित्य पुरस्कारप्राप्त साहित्यिकांचा थोडक्यात परिचय दिलीप वि. चित्रे साहित्य जीवनगौरव पुरस्कार २०२३
डॉ. तारा भवाळकर

अध्ययन, अध्यापन, संशोधन आणि लेखन यांचा आयुष्यभर ध्यास घेतलेल्या आणि तेच आपले जीवितकार्य (मिशन) मानणाऱ्या डॉ. तारा भवाळकर यांना महाराष्ट्राच्या विचारविश्वात एक ज्येष्ठ आणि व्यासंगी विदुषी म्हणून ओळखले जाते. नाटक आणि रंगभूमी, मराठी भाषा आणि साहित्य, स्त्रीमुक्ती चळवळ, अंधश्रद्धा निर्मुलन चळवळ आणि, लोकसाहित्य आणि लोकसंस्कृती हे ताराबाईच्या आस्थेचे विषय आहेत आणि या क्षेत्रात सक्रियपणे आणि अखंडपणे त्या सहभागी होत आल्या आहेत. या विषयावर त्यांनी विपुल लेखन केले असून अलीकडेच प्रकाशित झालेल्या ‘सीतायन’ सह त्यांचे एकेचाळीस ग्रंथ प्रकाशित झाले आहेत आणि त्याला महत्वाचे संदर्भ – मूल्य प्राप्त झाले आहे. मराठी विश्वकोषासह समाज विज्ञान कोष, मराठी वाड्मय कोष, मराठी ग्रंथ कोष, शिल्पकार चरित्रकोष इत्यादी मध्ये त्यांनी नोंदी लिहिल्या आहेत. विशेषतः लोकसाहित्य, लोककला, आणि लोकसंस्कृतीच्या व्यासंगी अभ्यासक आणि संशोधक म्हणून त्या मराठी वाचकांना सुपरिचित आहेत.