महाराष्ट्र फाऊंडेशन विशेष कृतज्ञता पुरस्कार २०२०- जतीन देसाई
१९७०च्या अस्वस्थ दशकात जयप्रकाशांच्या विचारांनी प्रेरित होऊन स्थापन करण्यात आलेल्या ‘छात्र युवा संघर्ष वाहिनी’चे जतीन देसाई सैनिक झाले. पुढं ते पूर्णवेळ पत्रकार म्हणून काम करू लागले. भारत-पाक संबंध सुधारायचे असतील तर केवळ दिवाणखानी गप्पांमधून काही होणार नाही. सौराष्ट्राच्या किनारपट्टीवरील मच्छीमार अनवधानाने सागरी सीमा ओलांडतात आणि पाकिस्तानच्या जाळ्यात सापडून तेथील तुरुंगात खितपत पडतात. तीच गोष्ट पाक मच्छीमारांबाबतही होते. या मच्छीमारांच्या सुटकेसाठी जतीन देसाईंनी प्रयत्न सुरू केले. त्याच ‘पाकिस्तान इण्डिया फोरम फॉर पीस ॲण्ड डेमोक्रसी’ या संस्थेच्या भारतीय चॅप्टरचा मग ते सरचिटणीसही झाले. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील सरकारांकडून काही चांगली कामं करून घेण्यासाठी दबावगट निर्माण करणं, हे या संस्थेचं मुख्य उद्दिष्ट आहे. पाकिस्तान व सार्क राष्ट्रांमधील संघटना यांबद्दल जतीन देसाईं एक ‘ऑथॉरिटी’ समजले जातात.


