महाराष्ट्र फाऊंडेशन ललित ग्रंथ पुरस्कार २०२०- किरण येले
किरण येले यांच्या ‘तिसरा डुळा’ या कथासंग्रहाला २०२० सालाकरताचा महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार जाहीर झाला आहे. किरण यांना साहित्याच्या दुनियेत खरी ओळख मिळाली ती ‘बाईच्या कविता’ या बहुचर्चित कवितासंग्रहामुळे. ‘मोराची बायको’ या कथासंग्रहामुळे बदललेल्या लेखन-प्रवासातही किरण तितकेच यशस्वी झाले. माणसा-माणसांमधील संबंध, नाती आणि बिननाती, त्यांतील ताणेबाणे, आकर्षण, ओढ, त्यामागील नैतिकता आणि नैतिकतेचं ओझं यांसारख्याअनेक गोष्टींची चिकित्सा किरण यांनी या कथांमधून केली आहे. किरण आपल्या लेखनात फॅन्टसी, संवादांची आधुनिक माध्यमं, स्वप्न आणि आभासात्मक निवेदनतंत्र, संज्ञाप्रवाह यांसारख्या रचनाबंधांचा चपखलपणे वापर करतात. किरण येले हे भाऊ पाध्ये आणि मंटो यांचा वारसा चालवणारे कथाकार आहेत असे म्हणणे नक्कीच अतिशयोक्तीपूर्ण ठरणार नाही.


