Select Page

कुमार केतकर

साहित्य : जीवनगौरव पुरस्कार 2014

पत्रकार, संपादक, लेखक
पत्ता –
संपर्क – मो. ९८२१५२४१३१

तीन दशकांहून अधिक काळ इंग्रजी व मराठी पत्रकारितेत आपला ठसा उमटवणारे पत्रकार म्हणून कुमार केतकरांचा उल्लेख करता येईल. महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, लोकसत्ता, दिव्यमराठी या दैनिकांत संपादकपद त्यांनी भूषविले अनेक ज्ञानशाखांमध्ये त्यांना उत्तम गती आहे. त्याचप्रमाणे राजकारण, समाजकारण, अर्थकारण यांची त्यांना नेमकी जाण आहे. त्यांचे विविध विषयांवरील अग्रलेख वाचणे हा एक बौद्धिक आनंदाचा भाग असतो. अभ्याससपूर्ण आणि तार्किक मांडणी, विवेकवादी आणि रोखठोक विचार आणि डोळ्यांसमोर कायम आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा व्यापक पट यामुळे त्यांच्या वैचारिक लेखनाला एक वेगळेच परिप्रेक्ष्य प्राप्त होते. वृत्तपत्रातूनही संपादक या नात्याने लिहिलेले सात हजारांहून अधिक अग्रलेख असा त्यांचा लेखन आवाका आहे. कार्ल मार्क्स, म. गांधी, बट्रॉड रसेल व जे. कृष्णमूर्ती यांच्या विचारांचा विशेष प्रभाव आहे. त्यांची भाषाशैली सरळ, साधी, सोपी आहे. त्यांची राजकीय-सामाजिक-आर्थिक मते ठाम असतात. त्यांमागे भरपूर वाचन आणि विचारांचा भक्कम पाया असतो. ‘ज्वालामुखीच्या तोंडावर’, ‘कथा स्वातंत्र्याची’, ‘विसाव्या शतकाचे महानिर्वाण’, ‘शिलंगणाचं सोनं’, ‘ओसरलेले वादळ’, ‘मोनालिसाचे स्मित’, ‘विश्वामित्राचे जग’, ‘बदलते विश्व’ अशा पुस्तकांमधील त्यांचे लेखन हे समाजसन्मुखतेची आणि द्रष्टेपणाची साक्ष पटवते. या त्यांच्या साहित्य लेखनाचा गौरव म्हणून महाराष्ट्र फाउंडेशन २०१३ चा ‘ साहित्य जीवनगौरव पुरस्कार’ कुमार केतकर यांना प्रदान करीत आहे.

अंकातील मुलाखत वाचा…

पुरस्कार विजेते पुस्तक/ग्रंथ  

महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार 2014 – कुमार केतकर