महाराष्ट्र फाऊंडेशन रा. शं. दातार नाट्य पुरस्कार – साहित्यकृती : ‘चार एकांकिका’ (नाट्यसंहिता) – मुक्ता बाम पुणे
नाटक लिहायचे असेल तर मुळात प्रश्न विचारता यावे लागतात. या प्रश्नांची उत्तरे शोधण्यातूनच नाटक पुढे जात असते. नाटक लिहिण्याचे आणि दिग्दर्शित करण्याचे प्रयत्न करणाऱ्या स्त्रियांची संख्या खूपच कमी दिसते ते स्त्रियांना प्रश्न विचारता येत नाहीत म्हणून नव्हे तर त्यासाठी त्यांना संपूर्ण व्यवस्थेशी झगडावे लागते म्हणून. स्त्रियांनी प्रश्न विचारता येतील असे वातावरण आधुनिकतेत निर्माण झाले. मुक्ता बामसारख्या नवोदित नाट्यकर्तीला स्त्रियांनी प्रश्न विचारण्याची परंपरा पुढे नेता येईल अशी शक्यता तिच्या एकांकिका दर्शवतात.‘विपाशा, ‘टिळा’, ‘रंग’ आणि ‘ऑस्कर’ या मुक्ताच्या चारही एकांकिका स्त्रियांना किंवा व्यवस्थेपेक्षा वेगळा विचार करणाऱ्यांना पडणाऱ्या प्रश्नांशी झगडतात. तिच्या नाटकातील पात्रे काल आणि अवकाश यांच्या मर्यादा न पाळता आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी जिथे जो विचार, जी कल्पना सापडेल त्याला खेचून आणतात. अमेरिकेतील वंशवाद आणि भारतातील जातीयता यांच्यातील दुवे शोधणारी वैश्विक मानसिकता, समलिंगी लेखकाला भोगाव्या लागणाऱ्या यातना, ब्राह्मणी परंपरांमधील स्त्रीचे शोषण आणि वेश्या व्यवसायातील स्त्रीचे शोषण यांची तुलना असे विषय मुक्तासारख्या तरुण व्यक्तीला आव्हानात्मक वाटतात हे आश्वासक आहे.