पुरस्काराचे नाव – ग्रंथ पुरस्कार (ललित)
कथासंग्रह – गॉगल लावलेला घोडा
पुरस्काराचे स्वरूप – पन्नास हजार रुपये आणि सन्मानचिन्ह
पुरस्कार सन्मानित व्यक्तीचे नाव – निखिलेश चित्रे
‘गॉगल लावलेला घोडा’ हा निखिलेशचा पहिलावहिला कथासंग्रह. अवघ्या नऊ कथांचा. ‘पालघर नावाच्या गावास’ अशी या संग्रहाची अर्पणपत्रिका आहे आणि प्रत्यक्षात या कथा घडतातही पालघर-डहाणू परिसरातच. निखिलेशच्या कथा त्याच्या आडवाटांवरच्या, झाकोळलेल्या-निसरड्या पायवाटांवरच्या आणि सांदीकोपऱ्यांतल्या वाचनातून मिळालेल्या साहित्यिक वारशातून आणि मिळालेल्या वाचनानंदातून लिहिल्या गेलेल्या आहेत. अर्थात त्या स्वतंत्र आणि सर्जनशील-प्रयोगशील आहेत. कथात्म साहित्याचं वैशिष्ट्य हे असतं की, त्यातलं जग कितीही असंबद्ध, अतार्किक, अशक्य वा अनुभवापलीकडचं असलं, तरी ते आपल्याला स्वत:बरोबर घेऊन जातं, त्या जगाची सैर घडवतं. त्याचा प्रत्यय निखिलेशच्या कथा वाचताना येतो. या कथांमध्ये पुस्तकांचे आणि जगभरातल्या लेखकांचे संदर्भ येतात,
पुस्तकविक्रेत्यांचे उल्लेख येतात, लेखकाच्या लिहिण्याच्या प्रक्रियेविषयी कथांतली पात्रं बोलतात. साहित्याच्या जागतिक पातळीवर ‘फिक्शन’मध्ये इतके काय काय प्रयोग झालेले आहेत की, विचारता सोय नाही! निखिलेशच्या कथा त्या ‘फिक्शन-परंपरे’च्या कथा आहेत.
लॅटिन अमेरिकन, सर्बिया, ऑस्ट्रिया, हंगेरी, पोर्तुगाल, चेक, इटालियन, स्पेन, या देशांतले आपल्याला पूर्ण अपरिचित असलेले लेखक व त्यांची पुस्तकं हे निखिलेश चित्रे यांचे ‘जीवलग’ स्नेही, आप्त आहेत. या कथासंग्रहाखेरीज जागतिक पुस्तकांच्या वाचनावर आधारित Books on Books या प्रकारातले त्यांचे ‘आडवाटेची पुस्तकं’ हे पुस्तक आणि साहित्य अकादमीसाठी अनुवाद केलेले ‘राइनक मारिआ रिल्केची निवडक पत्रं’ हे पुस्तक ही दोन त्यांची महत्त्वाची पुस्तके आहेत.