Select Page

समाजकार्य विशेष पुरस्कार
(सामाजिक प्रश्न, विशेष कार्य पुरस्कार) २०२३
नीतिन पवार (पुणे)

(एक लक्ष रुपये आणि सन्मानचिन्ह असे पुरस्कारचे स्वरूप आहे.)

अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून पुढे येताना ‘विधायक युवा’ नावाच्या संघटनेच्या माध्यमातून शिक्षणासाठी विविध उपक्रम राबवत सामाजिक कामांची सुरुवात केली. त्यानंतर साक्षरतेसाठी सुरू झालेले अक्षर आंदोलन असो, किंवा भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन असो, त्यांनी राज्यपातळीवर प्रभावी नेतृत्व केले. विविध कलाजत्थ्यांच्या माध्यमातून जनजागृती करणे, कारागृहातील कैद्यांना शिक्षणासाठी प्रेरणा देणे, बाबरी पडल्यावर पुण्याच्या महापौरांसह नगरसेवकांचे एक कलापथक तयार करून सामाजिक सलोख्यासाठी प्रयत्न करणे, असे नावीन्यपूर्ण विधायक उपक्रम राबविण्यात त्यांचा पुढाकार होता.
समाजप्रबोधनासाठी महत्वाची भूमिका बजावणार्‍या ‘पुरोगामी

सत्यशोधक’ तसेच ‘जनआंदोलन’ या नियतकालिकांचे त्यांनी संपादन केले आहे. एकीकडे प्रबोधनाचे काम सुरू असतानाच शोषितांच्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावरचा संघर्ष सुद्धा सातत्याने सुरू होता. डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली विविध असंघटित कष्टकर्‍यांच्या ‘अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समिती’चा 20 वर्षे निमंत्रक म्हणून कार्यरत आहेत. एकीकडे रिक्षा-टॅक्सीचालक यांच्या विविध मागण्यांसाठी लढत असतानाच त्यांनी बांधकाम कामगारांच्या विकास आणि न्यायासाठी बांधकाम मजदूर सभेची स्थापना केली. त्याचबरोबर अंगणवाडी कर्मचारी सभा, महाराष्ट्र यांच्या माध्यमातून अंगणवाडी सेविकांचे मानधनवाढ, कर्मचार्‍यांचा दर्जा इ. साठी मोर्चे, आंदोलन करून न्याय मिळवून देण्यात पुढाकार घेतला आहे.
स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, इ. भारतीय राज्यघटनेतील मूल्ये प्रत्यक्षात साकार व्हावीत आणि जाती, धर्मनिरपेक्ष, विज्ञाननिष्ठ समाजनिर्मिती व्हावी यासाठी त्यांनी रचना, संघर्ष, प्रबोधन ह्या त्रिसूत्रीद्वारे केलेल्या कामातून बांधकाम मजुरांसाठी सुरक्षिततेसाठी ‘बांधकाम कामगारांचा रोजगार व सेवाशर्ती नियमन आणि कल्याणकारी कायदा’, ‘असंघटितांचा सामाजिक सुरक्षा कायदा’ लागू होण्यासाठी त्यांचे मोलाचे योगदान आहे.