महाराष्ट्र फाऊंडेशन ग्रंथ पुरस्कार (अपारंपरिक / वैचारिक) – प्रदीप पुरंदरे
प्रदीप पुरंदरे यांची वैचारिक बांधिलकी कायमच पुरोगामी आणि समतावादी राहिलेली आहे. ते दुष्काळमुक्ती, साक्षरता, उजनीधरण, जायकवाडी धरणाचे लाभ-हानी या विषयांवर मुख्यत: काम करत असतात. जायकवाडी धरणग्रस्तांचं उपोषण, मराठवाड्यातला पाण्याचा अनुशेष, जलयुक्त शिवार योजनेमधील गैरप्रकार हे त्यांचे आस्थेचे विषय आहेत. सध्या नियंत्रणशून्य पाणीवापर होत असून आपले सिंचन प्रकल्प मोठ्या प्रमाणावर आजारी आहेत. नवीन तंत्रज्ञान लोकाभिमुख वैज्ञानिकतेच्या दृष्टिकोनातून आणलं गेल्यास आणि शेतकरी नियंत्रित पद्धतीने राबवलं गेल्यास त्यात निश्चित फरक पडू शकतो. या विषयावर प्रदीप पुरंदरे यांच्या लेखांची ‘विधिलिखित’ ही पुस्तिका प्रसिद्ध झालेली आहे. ‘पाण्याचा जागल्या’ होणं ही खडतर गोष्ट आहे. त्यासाठी अभ्यास, कोरडवाहू जनतेशी बांधिलकी, संघर्षाची तयारी, माध्यमं हाताळण्याचं कसब आणि जिद्द या साऱ्या गोष्टी असणारे प्रदीप पुरंदरे सामाजिक क्षेत्रात महत्त्वाचं कार्य करत आहेत.


