वाङ्मयप्रकार पुरस्कार २०२२
राजन गवस, कोल्हापूर- कथा आणि कादंबरी
एक लक्ष रुपये आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे
ऐंशीच्या दशकात कथा/कादंबरीकार म्हणून राजन गवस पुढे आले. आपल्या स्वतःच्या अशा सर्जनशील दृष्टीने आणि आशय, विषय आणि आविष्काराच्या पद्धतीने त्यांनी कथा/कादंबऱ्या लिहिल्या आणि स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. आज ते मराठी साहित्यातील एक आघाडीचे कथाकार आणि कादंबरीकार म्हणून ओळखले जातात. रिवणा वायली मुंगी (२००१), आपण माणसात जमा नाही (२००९) हे कथासंग्रह आणि ‘चौंडकं’ (८५), भंडारभोग (८९), धिंगाणा (९१), कळप (९७), तणकट (९८) आणि ‘ब – बळीचा’ या कादंबऱ्या ही राजन गवस यांची साहित्य संपदा आहे. ‘वास्तवता’, ‘दोहीयता’ आणि ‘लेखकाची नैतिकता’ ही तत्वत्रयी गवस यांच्या साहित्याच्या मुळाशी आहे. स्त्रीविषयक जाणिवा आणि बाईपण, गाव पातळीवरील राजकीय जाणिवांचे चित्रण, ग्रामीण जीवनाचे तुटलेपण आणि गावगाड्यात झालेले बदल, सामाजिक राजकीय समस्या, वंचित, उपेक्षित आणि शोषीतांचे जग ही गवस यांच्या कथांची आशयसूत्रे आहेत आणि ती त्यांच्या कथांमधून भेदकपणे प्रकट झाली आहेत. पुरोगामी, परिवर्तनवादी जीवनदृष्टीचा स्विकार हा गवसांचा लेखकीय दृष्टिकोण आहे. सामाजिक चळवळीत गवस यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यामुळे चळवळीतले अर्थकारण, राजकारण, भ्रष्टाचार, परस्पर संबंध त्यांना आतून बाहेरून माहिती आहे. त्यांच्या कादंबऱ्यांची अधिकृतता त्यातून निर्माण झाली आहे. आणि कादंबरीच्या रचनातंत्रावर प्रभुत्व असल्यामुळे या कादंबऱ्या कलात्मकही झाल्या आहेत.









