पुरस्काराचे नाव – रा.शं.दातार नाट्यलेखन पुरस्कार
नाट्यसंहिता – पाच मजली हॉस्पिटल
पुरस्काराचे स्वरूप – पन्नास हजार रुपये आणि सन्मानचिन्ह
पुरस्कार सन्मानित व्यक्तीचे नाव – ऋत्विक व्यास
ऋत्विक व्यास यांनी लिहिलेलेपाच मजली हॉस्पिटल हे नाटक व्यक्ती, उतरंडीच्या समाज व्यवस्थेतील प्राधान्यक्रम आणि संस्थात्मक स्तरावरली उदासीनता अशा महत्त्वाच्या आणि
गुंतागुंतीच्या विषयांना भिडते. एखाद्या व्यक्तीवर होणारा अन्याय आणि त्याला फोडली जाणारी वाचा कितीही प्रयत्न केले आणि संस्थात्मक स्तरावर विविध समित्या बनवल्या तरी ‘उच्चशिक्षित’ मानल्या जाणाऱ्या समाजात व्यक्तीचे आंतरिक आणि बाह्य त्रासाचे स्वर पोहोचताच नाहीत. त्यातून, व्यक्ती आणि समाज काहीही न बदलणारी व्यवस्था यातच अधिक खोलवर शिरत जातात हेच फलित सर्वांच्या पदरात पडते याबद्दलची तीव्र जाणीव करुन देणारे हे नाटक आहे असे आमचे सर्वांचे मत पडले. या नाटकातील व्यक्तिरेखांना पाचव्या मजल्यावर “नकोशा”
वाटणाऱ्या चर्चेला सामोरे जावे लागणे यातच समाजाच्या आणि व्यक्तीच्या असुरक्षिततेची आणि उदासीनतेची प्रतीके आहेत याची नाट्यात्म जाणीव हे नाटक करून देते. दैनंदिन जीवनात घडणारे प्रसंग मांडणे आणि त्यांची नाट्यमय रीतीने – नियोजनबद्ध – उजळणी करत शोषित, शोषक आणि बघे ह्यांमधले गुंतागुंतींचे पैलू हे नाटक वास्तववादी तऱ्हेने मांडते. व्यक्तीची भीती, आत्मपरीक्षणाची टाळाटाळ आणि स्थितीवादी मानसिकता यांचेही विविध पैलू आपल्याला पाहायला मिळतात. आधुनिक काळात बदलत्या समाज धारणां, शहरीकरणात प्रगत आणि गरजेची मानली जाणारी वैद्यकीय सेवा देणाऱ्या मूलभूत व्यवसाय क्षेत्रांत स्त्रीच्या प्रश्नाकडे आजही समाज कसा पाहतो याबद्दलची परिणामकारक नाट्यमय मांडणी वर्ग (class) आणि लिंग (gender) भेदांची सरमिसळ करत हे नाटक आपल्या मांडणीला विशेष धार देते.