महाराष्ट्र फाऊंडेशन वाङ्मयप्रकार पुरस्कार पर्यावरण विषयक सन्मान २०२१- संतोष शिंत्रे, पुणे
संतोष शिंत्रे यांनी एक सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. पुढे ते पर्यावरण पत्रकारितेकडे वळले. त्यानंतर त्यांनी आपल्या अभ्यासाच्या विषयांची मांडणी कथात्म रूपात करायला सुरुवात केली आणि पर्यावरणकथा हा एक नवीनच प्रकार मराठीत सुरु झाला. पर्यावरण विषयातल्या अनेक सरकारी निर्णयांकडे धोरणांकडे चिकित्सक दृष्टीने बघून त्यावर अभ्यासपूर्ण आकडेवारीनिशी लिहिलेले संतुलित लेख हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.संतोष शिंत्रे यांचे कार्य अनेक क्षेत्रांना स्पर्श करणारे आहे. वैज्ञानिकांना संशोधन-लेखनासाठी मार्गदर्शन करणाऱ्या आज्ञावलीपासून ते लेखनमित्रसारख्या लेखनकोशापर्यंत; शेल सिल्व्हरस्टाईनच्या कवितांपासून ते ‘राजा शिवछत्रपती’, ‘छत्रपतींचे आरमार’, ‘सरिता कोष’ अशा अनुवादांपर्यंत तर चालू शतकातले जागतिक व भारतीय निसर्ग पर्यावरण यासारख्या माहितीपूर्ण ग्रंथापासून ते ‘पिंक हेडेड डक’ किंवा ‘मनेर मानुषेर इंद्रजाल’ अशा कथनात्मक लेखनापर्यंत त्यांचा संचार आहे.