ग्रंथ पुरस्कार (ललित)
काम तमाम ऍट वाघा बॉर्डर (कथा संग्रह) २०२३
सतीश तांबे
आशय, विषय आणि शैली यांच्या अनोख्या आविष्कारातून सतीश तांबे यांनी मराठी कथा विश्वात स्वतःची अशी स्वतंत्र नाममुद्रा निर्माण केली आहे.मध्यंतरीच्या काळामध्ये ‘कथा’ हा हिणकस साहित्य प्रकार आहे अशी कठोर टीका नेमाडेंसारख्या ज्येष्ठ कादंबरीकाराने केली होती. अशा काळात कथेची ताकद केवढी आहे हे ज्या कथाकारांनी आपल्या समर्थ कथा लेखनानी दाखवून दिले, त्यातील एक अग्रगण्य नाव म्हणून सतीश तांबे यांचे नाव आवर्जून आणि आदराने उल्लेखता येईल. विविध वाङ्मय प्रकारात संचार न करता अव्यभिचारी निष्ठेने आणि आपली अवघी प्रतिभा पणाला लावून तांबे यांनी कथा लेखन केले आहे.‘काम तमाम ऍट वाघा बॉर्डर’ या त्यांच्या प्रस्तुत संग्रहातील कथांमध्येप्रामुख्याने मध्यमवर्गीय जीवनाचा दंभस्फोट करणा-या आहेत. मात्र या संग्रहामधल्या कथांमधून कथाकार सतीश तांबे यांनी पुढचा टप्पा गाठला असून त्यामधून समकालीन वास्तवातील सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय स्वरूपातील उन्मादाचा, दहशतीचा, अनिश्चिततेचा आणि जातीय विश्वाचा अंतर्वेध घेतला आहे. या प्रदूषित पर्यावरणाचा व्यक्तिगत जीवनावर होणाऱ्या परिणामांचा वेध तांबे यांनी घेतला आहे. एक लेखक म्हणून तांबे यांचा दृष्टकोण पुरोगामी आणि आधुनिक राहिला आहे. अशा लेखकाला वाटणारी चिंता म्हणजे या कथा होत. या कथा म्हणजे समकालीन वास्तवाची ‘समालोचना (critique)’ आहेत असे म्हणणे सार्थ ठरेल.