
शिवाजी कागणीकर
कार्यकर्ता पुरस्कार 2013 : असंघटित कष्टकरी
सामाजिक कार्यकर्ते
पत्ता – मुक्काम निंगेनहट्टी, पो. कुरिहाळ, तालुका व जिल्हा बेळगाव ५९११४३
संपर्क – मो. ८२७५४८३३८८
शिवाजी कागणीकर हे मेंढपाळ धनगर कुटुंबातले. बेळगावच्या निंगेनहट्टी, कुरिहाळ येथील त्यांचे वास्तव्य. शिक्षणासाठी घरच्यांचे प्रोत्साहन नव्हते पण ते शिकत राहिले. १९७२ मध्ये कडोलीत तरुण शंतिसेनेचे शिबीर झाले. यातील महात्मा गांधी, विनोबा, साने गुरुजींच्या विचारांतून प्रेरणा घेउन सामाजिक परिवर्तनाचा शिवाजी यांनी ध्यास घेतला. सर्वोदयी कार्यकर्ते सदाशिवराव भोसले यांच्या समवेत डोंगराळ भागातील मागासलेल्यांची सेवा करण्याचे व्रतच त्यांनी घेतले. शिक्षण, आरोग्य, साक्षरता, शेती प्रसार ते निष्ठेने व समपर्णवृत्तीने करत असत. १९७८ मध्ये स्थापलेल्या जनजागरण संस्थेच्या माध्यमातून वीस गावांत पस्तीस रात्र शाळा सुरु झाल्या. दिवसभर मजुरीला व जनावरांच्या राखणीला गेलेली मुले या वर्गात येत. त्यात बेरड, दलित समाजातील मुले प्रामुख्याने असत. मुलींचे प्रमाण तर ६० टक्के इतके होते. ग्रामीण महिला, बालके यांच्यासाठी सनदशीरमार्गाने सन्मान मिळावा, तरुणांनी विज्ञानाची कास धरावी यासाठी शिवाजीदादा अहोरात्र झटत असतात. बंबरगा, कट्टणभावी, कडोली, खडीमशीन अशा खेडयांमधील हजारो लोकांना रोजगार हमीवर काम मिळावे म्हणून कागणीकर प्रयत्नशील असतात.