
श्याम मनोहर
साहित्य जीवनगौरव पुरस्कार २०१५
कादंबरीकार, नाटककार
पत्ता –
संपर्क – मो. ९४२१८२९६३५
श्याम मनोहर यांचे संपूर्ण नाव श्याम मनोहर आफळे. त्यांच्याबद्दल आसाराम लोमटे ‘लोकसत्ता’मधील एका लेखात म्हणतात, ‘हे ईश्वरराव.. हे पुरुषोत्तमराव’ (१९८३), ‘शीतयुद्ध सदानंद’ (१९८७), ‘कळ’ (१९९६), ‘खूप लोक आहेत’ (२००२), ‘उत्सुकतेने मी झोपलो’ (२००६), ‘खेकसत म्हणणे, आय लव्ह यू’ (२०१०), ‘शंभर मी’ (२०१२) या कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या आहेत. ‘आणि बाकीचे सगळे’, ‘बिनमौजेच्या गोष्टी’ या दोन कथासंग्रहांमधून त्यांच्या कथेचा प्रवास सुरू झाला. कथेतून ते कादंबरी वाङ्मयाकडे स्थिरावले. त्यांची कथासुद्धा वेगळी आहे. मराठीतल्या आधुनिक, प्रयोगशील, नवकथा या सर्वाहून तिची वेगळी ओळख आहे. मराठी कथेच्या कोणत्याच परंपरेत या कथांना बसवता येत नाही. त्यांच्या कादंबऱ्यांचेही तसेच आहे. कथा, कादंबरी असे न म्हणता ‘कथात्म साहित्य’ म्हणत श्याम मनोहर ‘फिक्शन’संबंधी विचार करतात. त्यांच्या मते ‘फिक्शन’चेही दोन प्रकार आहेत. ज्ञात असलेले ज्ञात पद्धतीने सांगणे- एक प्रकार. अज्ञातातले काही शोधू पाहणे आणि आतापर्यंत वापरल्या गेलेल्या पद्धतींपेक्षा वेगळ्या पद्धतीने लिहिणे- हा दुसरा प्रकार. श्याम मनोहर अर्थातच ‘फिक्शन’च्या या दुसऱ्या प्रकारातले लेखक आहेत. त्यांची कुठलीही परंपरा नाही, आणि पुढे अनुकरणाच्या माध्यमातून ही परंपरा कुणाला चालवता येईल असेही नाही. त्या अर्थाने ते एकमेव आहेत. जुन्या पद्धतीने सांगायचे झाल्यास ‘यासम हा’ असाच हा लेखक आहे. श्रेष्ठ दर्जाच्या कथात्म साहित्यासाठी जगण्यासंबंधीचे सखोल चिंतन असावे लागते आणि विलक्षण अशी कल्पनाशक्तीही असावी लागते. श्याम मनोहर हे दोन्ही बाबतीत सरस आहेत. त्यातही त्यांचे जगण्यासंबंधीचे चिंतन हे असंख्य प्रश्नांच्या अंगाने येते. हे प्रश्न रोजच्या जगण्यातले आहेत, बारीकसारीक घटनांमधून उपजलेले आहेत, तरीही ते सोपेपणाच्या पायऱ्या ओलांडून चिकित्सेचा मार्ग धुंडाळतात. हे प्रश्न धर्मासंबंधीचे आहेत, अध्यात्मासंबंधीचे आहेत, विकारांसंबंधीचे आहेत. व्यक्ती, कुटुंबसंस्था, समाज या त्रिस्तरीय रचनेतल्या अशा अनेक जागा असंख्य प्रश्नांनी घेरलेल्या आहेत. त्या जागा हा कादंबरीकार नेमक्या शोधतो. मत्सर घालवायचा कसा? लोभ घालवायचा कसा? किती प्रमाणातला मत्सर समाजात संमत आहे? विकारांचे मी काय करतो? विकार माझे काय करतात? आपल्या समाजात धर्माची गरज वाटणारे किती लोक असतील? ज्यांना धर्माची आवश्यकताच वाटत नाही अशांनी मेळावे घ्यायचे ठरवले तर धर्माची गरज वाटणारा जो समाजातला वर्ग आहे त्याची प्रतिक्रिया काय असेल?.. प्रश्नांची ही यादी आणखी खूप वाढवता येईल. श्याम मनोहरांच्या सगळ्याच कादंबऱ्या अशा जिज्ञासेतून आलेल्या आहेत…’
‘हृदय’, ‘ यकृत’ , ‘ येळकोट’ , ‘प्रेमाची गोष्ट’, ‘दर्शन’ ही त्यांची नाटके समकालीन समाज व संस्कृती मानवी व्यवहार व व्यक्तिच्या वर्तना मागची गुंतागुंत यांचे विश्लेषण करणारी आहे. व्यक्ती, समूह, कुटुंब, सामाजिक संस्था, त्यांचे परस्पर संबंध, व्यक्तीचे सामाजिक स्थान याचे व्यामिश्र चित्रण या लेखनात प्रकर्षाने जाणवतात.
साधनेच्या पुरस्कार विशेषांकातील मुलाखत वाचा…



