महाराष्ट्र फाऊंडेशन कार्यकर्ता (प्रबोधन) पुरस्कार सन्मान २०२१- सुरेश सावंत, मुंबई
सुरेश सावंत यांनी स्त्री-पुरुष समानता, अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक दृष्टीकोन, अन्न अधिकार, जाती अंताची चळवळ, संविधानातील मूल्यांचा प्रसार अशा विविध विषयांवर लेखनातून, प्रचार सभा आणि बैठकांमधून सक्रिय काम केले आहे. जनसंघटनेचे हे काम करताना त्यांचा पक्षनिरपेक्षतेचा आग्रह असतो.स्त्रीमुक्ती संघटनेच्या विविध उपक्रमांमध्ये भाग घेत त्यांनी आपल्या कार्याची सुरुवात केली. त्यानंतर काही काळाने त्यांनी पूर्णवेळ कार्यकर्ता होण्याचा निर्णय घेतला. स्त्री मुक्ती संघटनेचे उपक्रम, साक्षरता चळवळीत सहभाग, ट्रेड युनियनच्या कामात मदत, लाल निशाण पक्षात कार्यकारिणी सदस्य म्हणून काम अशा विविध प्रकारे ते सक्रिय राहिले. रेशनिंग चळवळीसाठी स्थापन झालेल्या ‘ रेशनिंग कृती समिती’मध्ये त्यांचे भरीव योगदान होते. विविध प्रश्नांवर काम करत असताना ते निरनिराळी मासिके,नियतकालिके, वर्तमानपत्रे, फेसबुक पेज, ब्लॉग, ऑनलाईन नियतकालिके अशा विविध माध्यमांमध्ये ते साध्या -सुलभ भाषेत लिखाण करत असतात. अक्षर प्रकाशनतर्फे त्यांच्या निवडक लेखांचे ’गुंता आणि उकल’ या नावाचे पुस्तक डिसेंबर २०१९ मध्ये प्रकाशित झाले आहे.