रा.शं.दातार नाट्य पुरस्कार २०२४ –
वामन पंडित, कणकवली (संपादक, ‘रंगवाचा’)
(पन्नास हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.)
सबकुछ नाटकाविषयी आणि तेही गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड न करता, असे सलग सात वर्षे प्रसिद्ध होणारे त्रैमासिक म्हणजे ‘रंगवाचा’. कणकवलीतून प्रसिद्ध होणाऱ्या या नियतकालिकाने नाट्यवेड्या महाराष्ट्राला अधिक समृद्ध केले आहे.कणकवली हे नाव नाट्यनकाशावर आलं त्याला आता ४५ वर्षे उलटून गेली आहेत. तळकोकण भागात उत्तम नाट्यगृह उभारून तिथे ‘वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान’च्या माध्यमातून वामन पंडित हे नाट्यवेडे गृहस्थ नाटक आणि रंगभूमीसाठी निरलसपणे काम करत आले आहेत. नाट्यवर्तुळात अत्यंत आदरानं घेतलं जाणारं आणि स्वबळावर प्रतिष्ठित झालेलं हे नाव. ‘वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान’ या संस्थेचं सांस्कृतिक क्षेत्रातील कार्याचेच विस्तारित अंग म्हणजे वामन पंडितांनी सात वर्षांपूर्वी ‘रंगवाचा’ हे नाट्यविषयक त्रैमासिक. २० फेब्रुवारी २०१७रोजी ‘रंगवाचा’चा पहिला अंक प्रकाशित झाला. ही सात वर्षांची वाटचाल सोपी मुळीच नव्हती. मराठीतील नियतकालिके जणू बंद पडण्यासाठी सुरू होतात की काय, अशी दुर्दैवी परिस्थिती असताना खंड पडू न देता, हाताशी-पाठीशी विशेष आर्थिक बळ नसतानाही सलग सात वर्षे रंगभूमीविषयक चळवळीचे हे मुखपत्र चालवणे हीच मोठी गोष्ट.