Select Page

ग्रंथ पुरस्कार (ललित) ‘धरणसुक्त’ (कादंबरी) २०२४ –
विलास शेळके, नाशिक
(पन्नास हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.)

धरणामुळे विस्थापित होणारी माणसं, गावं, यांची शोकांतिका मांडणाऱ्या मराठीमध्ये आजवर बऱ्याच कादंबऱ्या लिहिल्या गेल्या आहेत. यातल्या बहुतेक कादंबऱ्या ‘शोकात्म’ स्वरूपाच्या आहेत. मात्र ही कादंबरी धरण कसं बांधल जातं, याच्या निर्मितीची कहाणी सांगते. लेखक विलास शेळके महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागातून ‘मुख्य अभियंता’ म्हणून निवृत्त झालेले आहेत. त्यानंतर त्यांनी ही कादंबरी लिहिली आहे. ‘रातसा धरण’ आणि विद्युत प्रकल्पासह ‘देवघर धरण’ यांसारखी अनेक महत्त्वाची धरणे, त्यांनी शासकीय सेवेत असताना यशस्वीपणे पूर्ण केली आहेत. या कादंबरीत त्यांनी याच दोन धरणांच्या निर्मितीची कहाणी सांगितली आहे, ‘अमर’ या इंजिनीयर नायकाच्या माध्यमातून. थोडक्यात, ही अमर या इंजिनीयर नायकाच्या धडपडीची, प्रामाणिकपणाची, कष्टाची आणि प्रतिभेची गाथा आहे. धरण कसं बांधलं जातं, प्रत्यक्ष बांधकाम करताना काय काय करावं लागतं, काय काय घडतं, त्यात मंत्रालयापासून मजुरापर्यंत आणि स्थानिक राजकीय नेत्यांपासून भ्रष्ट मुकादमांपर्यंत किती प्रकारची माणसं सामील असतात, त्यांच्यातील परस्परव्यवहार, हितसंबंध कसे असतात, त्यातून मानवी भावभावनांचं जीवनाट्य कसं आकाराला येतं, नैसर्गिक आपत्तींमुळे मनुष्यहानीपासून श्रम-प्रतिभाशक्तीच्या हानीपर्यंत किती प्रकारची संकटं निर्माण होतात, आणि प्रशासकीय अधिकारी प्रामाणिक असतील, तर धरणाखाली येणाऱ्या गावांचं, त्यातील माणसांचंही कसं योग्य प्रकारे पुनर्वसन होतं, अशी मांडणी ही कादंबरी करते. यशोगाथा असल्यामुळे या कादंबरीचा शेवटही सुखान्त वळणानेच होतो.