Select Page

पुरस्काराचे नाव – ग्रंथ पुरस्कार (वैचारिक/ अपारंपरिक) वस्त्रगाथा
पुरस्काराचे स्वरूप – पन्नास हजार रुपये आणि सन्मानचिन्ह
पुरस्कार सन्मानित व्यक्तीचे नाव – विनय नारकर

मराठीतील हे एका वेगळ्याच विषयावरील हे पुस्तक आहे. ते जेवढे वाचनीय आहे, तेवढेच ‘पाहण्या’चेही पुस्तक आहे. दख्खनच्या भूप्रदेशात गेली अनेक शतके मराठी संस्कृती नांदते आहे. या संस्कृतीचं एक अविभाज्य अंग म्हणजे इथली वस्त्रं. साड्या, उपरणी, पंचे, धोतरं अशा अनेक प्रकारची वस्त्रं इथल्या लोकसंस्कृतीनं अंगीकारली आहेत. विनय नारकर यांचं “ वस्त्रगाथा” हे देखणं पुस्तक म्हणजे दख्खनच्या भूप्रदेशातल्या वस्त्रसंस्कृतीचा पट उलगडण्याचा सर्वांगसुंदर प्रयोग आहे.
मराठी भाषेतल्या ओव्यांसारख्या लोकवाङ्मयापासून ते संतकवींच्या रचना आणि म्हणी, वाक्प्रचारांमध्ये असणाऱ्या वस्त्रांविषयीच्या उल्लेखांचे आणि पारंपरिक कर्मकांडांमधल्या वस्त्रविषयक संकेतांचे 
 

धागेदोरे शोधत लेखकानं वस्त्रांच्या इतिहास आणि वर्तमानाचा धांडोळा या ग्रंथात घेतला आहे. साहित्यिक साधनांवर न थांबता लेखकानं चित्रं, मूर्ती आणि कारागिरांसोबत राहून आणि त्यांच्यासोबत विनम्रपणे संवाद साधून वस्त्रांच्या निर्मिती आणि वितरणाचाही सांस्कृतिक अभ्यास वाचकांसमोर मांडला आहे.
खास दखनी वस्त्रसंस्कृतीवरचं तपशीलवार, ससंदर्भ असं व्यापक भान असणारं पुस्तक हे या अभ्यासाचं एक फलित असलं तरी दुसरं व्यावहारिक फलित म्हणजे लेखकानं जवळपास नामशेष झालेल्या काही वस्त्रांचं ज्ञान असणाऱ्या संबंधित कारागिरांकडून त्या त्या प्रकारच्या वस्त्रांची पुन्हा निर्मिती करून एका अर्थी वस्त्रसंस्कृतीचं पुनरुज्जीवन केलं आहे. पुढे काही जुन्या पारंपरिक वस्त्रांच्या सोबत या पुनर्निर्मित वस्त्रांचं प्रदर्शन पुण्यातील खासगी संग्रहालयात करून त्यांनी या action research म्हणता येईल अशा कामाची सांगता केली आहे.
या पुस्तकात वस्त्रसंस्कृतीसारख्या ललितेतर आणि दृश्य विषयाची मांडणी उच्च निर्मितीमूल्यं सांभाळून केलेली आहे. त्यामुळे चंद्रकळेपासून ते पंचापर्यंतच्या वस्त्रप्रावरणांचे, कारागिरांचे उत्तम फोटो आणि वस्रांच्या निर्मिती आणि आविष्कारासंबंधीची मराठा चित्रशैलीचा वापर करून काढलेली चित्रं देखणी तर आहेतच, पण लेखकानं मांडलेल्या विचाराला पूरक आहेत. विकास गायतोंडे या जाहिरातक्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या तज्ञांनी पुस्तकाचं आरेखन केलं आहे. विनय नारकर यांनी आपल्या एकूण कारकीर्दीचं सार या पुस्तकामधून कथन केलं आहे असं म्हणता येईल.