
राजन गडकरी
राजन गडकरी हे कर्तृत्ववान आणि द्रष्टे म्हणून सर्वज्ञात आहेत.सुनील देशमुखांना जेव्हा साहित्य व समाजकार्य पारितोषिक योजनेची कल्पना सुचली, तेव्हा अर्थातच त्यांनी प्रथम राजन गडकरींशी संपर्क साधला. या योजनेचे निकष, स्वरूप व कार्यपद्धती यांची चर्चा व मार्गदर्शक म्हणून गडकरींचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. विशेषत: महाराष्ट्र फाउंडेशन तर्फे ही योजना कार्यान्वित करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. पुरस्कार ही कल्पनाच मुळात फाउंडेशनला नवीन होती.
इथे फंड गोळा करून भारतातल्या सामाजिक कार्याला पाठवणे ही परदेशातील समाजकार्याची टिपिकल कल्पना होती. यापेक्षा आमची वेगळीच संकल्पना होती. त्यातही ती योजना भारतात राबवणे सोपे नाही. त्यासाठी तिथल्या समविचारी संस्था व जाणकार, कार्यक्षम माणसे जोडणे हे सर्व इथे बसून कसे जमणार? या सर्व रास्त मुद्द्यांवर गडकरींनी सविस्तर व सुसूत्रपणे सारी कल्पना व माहिती देऊन त्यावेळच्या executive committee चे मन वळवले. ही १९९३ सालची गोष्ट. एवढेच नव्हे, तर गडकरींनी प्रा.दिगंबर पाध्ये, प्रकाश विश्वासराव यांसारखी समविचारी, ध्येयवादी आणि कार्यक्षम अशी महाराष्ट्रातली मंडळी जमवली. केवळ यामुळेच या महाराष्ट्र फाउंडेशन साहित्य व समाजसेवा पुरस्कारांची निवड प्रक्रिया,शानदार प्रदान समारंभ आणि जाणकारांच्या प्रेमाची पावती मिळाली. माधव गडकरी, श्री.पु. यांसारख्या मान्यवरांनीही त्याला साथ दिली. हे सर्व पायाभूत काम केवळ गडकरींच्या ध्येयवाद आणि कार्यक्षमता या अद्भुत रसायनामुळे साध्य झाले. एवढे सर्व करूनही गडकरी नेहमी प्रसिध्दीविन्मुख मागे राहून त्यांनी या पारितोषिक योजनेला बाळसे चढवले आणि वाढवले. हे घरचेच व समविचारी ध्येयाचे काम करणाऱ्या गडकरींचे आभार मानणे फारच औपचारिक होईल. म्हणूनच त्यांना मानाचा मुजरा!
राजन गडकरी
आधारस्तंभ, महाराष्ट्र फाउंडेशन