Select Page

 

अध्यक्ष, महाराष्ट्र फाउंडेशन – राजीव भालेराव

‘सर्वांसाठी सामाजिक आणि आर्थिक न्याय’ हा आमचा ध्यास आहे. या ध्यासाचा पाठपुरावा महाराष्ट्र फाउंडेशन दोन पद्धतीने करते. एक म्हणजे सेवाभावी संस्थांचे योग्य प्रकल्प निवडून त्यांना आर्थीक मदत करते. दुसरी म्हणजे समाजकार्यकर्त्यांना आणि पुरोगामी लेखकांना पुरस्कार देते. हे पुरस्कार देताना जुन्याजाणत्या साहित्यिकांचा सन्मान करणे आणि नव्या लेखकांना प्रोत्साहीत करणे हा एक हेतू असतो त्याचबरोबर आपलं आयुष्य झोकून जे समाजकार्य करतात, त्यांचा सन्मान करणे, त्यांना प्रोत्साहन देणे हाही हेतू असतो.

सर्व पुरस्कार सन्मानित व्यक्तींचे हार्दिक अभिनंदन. त्यांच्या लेखनाला आणि समाजकार्याला अभिवादन. या पुरस्कारांमुळे त्यांच्या कार्याला आणि निर्मिती क्षमतेला अधिक उर्जा मिळेल असा विश्वास मी व्यक्त करतो.

२०२१ साठी महाराष्ट्र फाउंडेशनने पाच सामजिक प्रकल्पांना मदत करण्याचे जाहीर केले आहे.
हे प्रकल्प आहेत – ‘महिला सार्वंगीण उत्कर्ष मंडळा’ म्हणजे ‘मासूम’चा सर्वीकल कॅंसर चाचणी कॅंप, प्रगती अभियान, ‘हॅलो मेडीकल फाउंडेशन’चा ‘मानसमित्र प्रकल्प’, ‘राजस्थान बाल शिक्षण संस्थेचे ‘हुनर घर’ आणि ‘टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायंस’चा प्रयास प्रकल्प. ह्या प्रकल्पांमुळे आदिवासी मुला-मुलींना शिक्षण मिळणार आहे, गावातल्या बायकांची सर्वीकल कॅंसरची चाचणी करण सुकर होणार आहे, हवालदिल शेतकऱ्यांचे मनोबल वाढणार आहे, गुन्हेगारांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करण्यास हातभार लागणार आहे आणि ग्रामीण भागात नोकऱ्या उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

महाराष्ट्र फाउंडेशनने आत्ता पर्यंत ‘कोविड रिलिफ’साठी १००,००० डॉलर्स चा निधी उभारला आहे त्या पैकी अर्ध्याहून अधीक निधी विविध सेवाभावी संस्थांना वितरीत केला आहे आणि उर्वरीत निधी वितरीत होण्याच्या मार्गावर आहे. ह्या महामारीची वैश्विक व्यापकता लक्षात घेउन हा निधी भारतातच नाही तर अमेरीकेत आणि मेक्सिकोतही उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. आला आहे. कोविडचे परिणाम दीर्घकाळ रहाणार आहेत म्हणून महाराष्ट्र फाउंडेशन ‘कोविड रिलिफ’ साठीचे निधी-संकलन पुढेही चालूच ठेवणार आहेत.

२०२० सालात कोविड महामारीप्रमाणेच वर्षाच्या सुरवातीला झालेले ब्रेक्सीट, अमेरीकेतील उफाळलेला वंशवाद, राष्ट्राध्यक्षांच्या निवडणूकीत समोर आलेले जनमानसाचे धृवीकरण, नंतर सत्तांतराला केलेला हिंसक विरोध आणि आर्थिक फटक्यांमुळे बदलणारा राष्ट्रांचा प्रभाव अशा जागतिक पातळीवरच्या राजकीय घटनांचे पडसाद पुढचे काही वर्ष आपल्याला जाणवत राहणार आहेत.

ही महामारी आपण निभावली ती शास्त्र आणि तंत्रज्ञानाच्या बळावर. डॉक्टरांनी आणि नर्सेसनी कठीण काळात आपल्याल साथ दिली. फार्मास्युटिकल्सच्या शास्त्रज्ञांनी अत्यंत कमी वेळात लस शोधून ती उपलब्ध करून दिली. तंत्रज्ञानामुळे लोकांचे कार्यालयीन कामकाज सुरू राहीले आणि महत्वाचे म्हणजे शक्य तिथे शिक्षण सुरू राहीले.

पहिल्या जागतिकीकरणाच्या लाटेत आपण अर्थकारणाने एकमेकांशी बांधलो गेलो. कोविडच्या महामारीमुळे जगातल्या प्रत्येकाचे स्वास्थ्य देखील आता एकमेकांवर अवलंबून आहे हे सिद्ध झाले आहे. शेवटी आपण एकमेकांवर किती अवलंबून आहोत, आपण एकमेकांसाठी किती जबाबदार आहोत याचे भान मनाशी ठेवून एक नवी सुरवात करण्याची संधी या महामारीने आपल्याला दिलेली आहे, असे मी मानतो. महाराष्ट्र फाउंडेशनने सततच अशा सकारात्मक वृत्तीचा पुरस्कार केलेला आहे.

पुन्हा एकदा सन्मानित सर्व व्यक्तींचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. धन्यवाद.

• राजीव भालेराव
अध्यक्ष, महाराष्ट्र फाउंडेशन