Select Page

सुनील देशमुख – महाराष्ट्र फाऊंडेशन

सुनील देशमुख यांचे दुःखद निधन (१९४८ ते २०२३)

‘महाराष्ट्र फाउंडेशन’चे पुरस्कार प्रवर्तक सुनील देशमुख यांचे ४ जानेवारी रोजी अमेरिकेतील फ्लोरिडा स्टेटमधील मायामी येथे भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ११वाजून ४० मिनिटांनी दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ७४ वर्षाचे होते.त्यांच्या मागे त्याची पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. गेली काही वर्षे त्यांना ङ्दयविकाराचा आजार होता. गेल्या वर्षी कर्करोगाचे निदान झाले. पण आपल्या आजाराशी त्यांनी धिराने सामना केला. आजाराबाबत ते कायम विनोदाने बोलायचे आणि हसून विषय बदलायचे. अत्यंत आनंदी, उत्साही, प्रेरक असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. सहा आठवड्यापूर्वी त्यांना Guillain – Barre syndrome (GBS) या आजाराने हातापायात तीव्र वेदना होऊ लागल्या. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. हॉस्पिटमध्येच त्यांना स्ट्रोक आला. मेंदुमधील गाठ काढण्याची शस्त्रक्रिया असफल झाली आणि ते कोमात गेले. गेले चार दिवस ते कोमात होते. तिथेच त्यांचे पत्नी-मुले आणि अन्य जवळच्या नातेवाइकांच्या सान्निध्यात शांतपणे निधन झाले.

सुनील देशमुख हे मुळचे सांगलीचे. त्यांचे मामा सेवा दलाचे होते आणि आई सुधारकी विचारांची होती. साने गुरुजींच्या वाङ्मयाचे संस्कार त्यांच्या मनावर झाले होते. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व या संस्कारात ते लहानाचे मोठे झाले. कुमार सप्तर्षी, अनिल अवचट आणि सांगलीचे क्रांती शहा यांचा त्यांच्या जगण्यावर प्रभाव होता. युक्रांदच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता. कुमार केतकर हे त्यांचे जवळचे मित्र होते. विद्यार्थीदशेत असताना मुंबईच्या स्टडीग्रुपमध्ये त्यांचा वावर होता..

मॅट्रिकला ते बोर्डात चौथे आले होते.. त्यांनी मुंबईच्या UDCT मधून (सध्याच्या ICT – Inst. of Chemical टेकनॉलॉजि) केमिकलं इंजिनीरिंगची पदवी घेतली. त्यांनी कॉलेजात असताना काही कविता लिहिल्या होत्या. सत्तरच्या दशकात ते अमेरिकेत गेले. त्यावेळी तिथे विद्यार्थी चळवळी जोरात होत्या. स्टुडन्ट फॉर डेमोक्रॅटिक सोसायटी (एसडीएस) या चळवळीत प्रामुख्याने होती. जग बदलण्याचे स्वप्न सत्तरच्या दशकात जगभरच्या तरुणांच्या मनात होते. तो त्यांच्यासाठी कायमच भारावलेला कालखंड राहिला. ‘Imagine there is no countries’ सारख्या प्रेरकगीतातला आशय जगभरच्या तरुणांना ‘आपला’ वाटत होता. त्यामुळे भारतातल्या मूल्यभानाला साजेसेच ते वातावरण होते.

पुढे त्यांनी अमेरिकेत लॉचे शिक्षण घेतले. एम.बी.ए. केले. वॉल स्ट्रीटवर मोठ्या पगाराची , मोठ्या पदाची नोकरी स्वीकारली. आयुष्यभरची कमाई त्यांनी वॉलस्ट्रीटवर तेलाच्या वायदेबाजारात पाच वर्षांत केली. यशाच्या अत्युच्च शिखरावर असताना त्यांनी अधिक पैसा मिळवण्याचा ध्यास न धरता वॉल स्ट्रीट सोडले आणि समाजासाठी, आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांसाठी काही तरी करायचे ठरवले. त्यातून १९९४ साली स्वतःच्या एक कोटीच्या निधीतून त्यांनी ही ‘साहित्य पुरस्कार योजना’ सुरू केली. त्यानंतर दोनच वर्षांनी त्यांनी आणखी एक कोटीची भर घालून सामाजिक कार्य करणाऱ्यांसाठी ‘समाजकार्य पुरस्कार योजना’ जाहीर केली. स्वतःच्या नावाचा आग्रह न धरता ती अमेरिकेच्या ‘महाराष्ट्र फाउंडेशन’तर्फे ती कार्यान्वित केली. महाराष्ट्रात त्यांच्याबरोबर त्यावेळी केशव गोरे स्मारक ट्रस्टच्या मृणालताई गोरे होत्या. त्यांचे कार्यकर्ते होते.लोकवाङ्मय गृहाचे प्रकाश विश्वासराव, सतीश काळसेकर ही मंडळी होती.अभिनव शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रा. दिगंबर पाध्ये आणि चंद्रकांत केळकर यांचाही या कार्यात सक्रिय सहभाग होता.

महाराष्ट्रातल्या इतर पुरस्कार योजनांपेक्षा पुरस्कारांची रक्कम खूपच जास्त होती. लेखकांच्या मान-सन्मानाला साजेशा शानदार समारंभ पहिल्या वर्षी झाला. काही अभ्यासवृत्तीही देण्यात आल्या. या पुरस्कारांसाठी अर्ज मागवायचे नाहीत, जाणकारांकडून शिफारशी मागवायच्या हे ठरलेलेच होते. पुरस्कारांचे निकष, निवडीची पद्धत ही लोकशाही निकषांवर आदारित आणि निःपक्षपाती अशीच होती. 2008 साली पुरस्काराचे केंद्र मुंबईतून पुण्यात हालवण्यात आले. दहा वर्षे साधना ट्रस्टच्या सहयोगाने आणि आता महिला सर्वांगिण उत्कर्ष समिती (‘मासूम’)च्या सहयोगाने या पुरस्कार योजनेची कार्यवाही होते. महाराष्ट्रातले कानाकोपऱ्यातले गुणी साहित्यिक आणि कार्यकर्ते यांचा शोध घेऊन महाराष्ट्र फाउंडेशन त्यांच्यापर्यंत जाते. त्यांचा सन्मान करते. आजवर एकूण ३५० ‘साहित्य पुरस्कार’ आणि ‘सामाजिक कार्यकर्ते’ पुरस्कार देण्यात आलेले आहेत.

सुनील देशमुखांनी अमेरिकेत पर्यावरणाच्या क्षेत्रातही अमेरिकेचे माजी उपाध्यक्ष अल् गोर यांच्याबरोबर कार्य केलेले आहे. अमेरिकेतले सर्वात वरचे दहा उद्योगपती घेतले तर त्यांनी आपली ९९ टक्के संपत्ती सामाजिक कार्याला दिलेली आहे. वॉरन बफे, बिल गेटस्, जॉर्ज सोरॉस अशांचा आदर्श देशमुखांनी आपल्यासमोर ठेवलेला होता. यांचे उदाहरण देऊन सुनील देशमुख म्हणायचे, ”सामाजिक बांधिलकीची ही जाणीव अमेरिकन उद्योगपतीत दिसते, पण भारतातल्या उद्योगपतींत का दिसत नाही?” ही सुनील देशमुखांची खंत होती. महाराष्ट्र फाउंडेशनच्या या पुरस्कार योजनेत उद्योगपतींनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा, असे त्यांना वाटे. पण मराठी उद्य़ोजकांनी त्याबाबत कधी फारसा उत्साह दाखवला नाही.

सुनील देशमुख आज आपल्यात नाहीत. पण त्यांचे हे कार्य आपण सर्वांनी आपले मानून पुढे नेण्याची जरुर आहे.

सुनील देशमुख यांना आदरांजली